सिंदेवाही येथे संत नगाजी महाराज, सेना महाराज यांचा पुण्यस्मरण महोत्सव
कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
समाजात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जन्मापासून ते मरणापर्यंत सुखदुःखाच्या कार्यात नाभिक समाजाची नाळ जुळली आहे. छत्रपती शिवरायांच्या मावळ्यातील एक प्रामाणिक मावळा म्हणजे जीवाजी महाले त्यांचा वारसा लाभलेला नाभिक समाज हा कर्तव्यप्रती अतिशय प्रामाणिक असून हीच त्यांची खरी ओळख आहे. असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते सिंदेवाही येथे संत नगाजी नाभिक समाज मंडळ द्वारे आयोजित संत शिरोमणी नगाजी महाराज तथा संत सेना महाराज यांच्या पुण्यस्मरण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमास ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
याप्रसंगी प्रामुख्याने अध्यक्ष म्हणून नाभिक समाजाचे ज्येष्ठ सल्लागार प्रभाकर फुलबांदे, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सतीश वारजुरकर,नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, सुनील लांडगे, माधवराव चन्ने ,रवी बेलपत्रे, अरुण जमदाळे, गुरुदास येडेवार, रवींद्र नलगंटीवार नरेश मांडवकर, विजय वाटकर , नगरसेवक युनुस शेख, प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी समाजातील ज्येष्ठ कर्तुत्वान नागरिक व गुणवंत विद्यार्थी यांचा सन्मान करण्यात आला.
पुढे बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, छत्रपती शिवरायांच्या जीवासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या जिवाजी महल्ले यांचा वारसा नाभिक समाजाला लाभलेला आहे. नाभिक समाज अत्यल्प प्रमाणात असला तरी मात्र नाभिक समाजाचे सेवाभावी कार्य हे वाख्यानेजोगे आहे. नाभिक समाजाने जुन्या रूढी, प्रथा व अंधश्रद्धेला बाजूला सारून समाजाने प्रगतीची वाट धरावी तसेच आपल्या पाल्यांना उच्च शिक्षणाकरिता प्रवृत्त करून शिक्षित करावे. असे आवाहनही यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. तसेच नाभिक समाजाची माझी पूर्वीपासूनच नाळ जोडली असून चिमूर विधानसभेतून आमदार म्हणून निवडून येताच सर्वप्रथम नाभिक समाजाला सभागृह बांधून दिले. त्याचप्रमाणे सिंदेवाही येथील नाभिक समाजाच्या व्यथाची आपणास जाणीव असून नाभिक समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. तर या समाजातील युवकांनी व्यसनाधीनतेकडे न वळता पुढाकार घेऊन समाज उन्नतीसाठी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सिंदेवाही येथे नाभिक समाजाचे सभागृह व वास्तू उभारण्याकरिता आपण यथाशक्ती मदत करू अशी ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा नाभिक समाज मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

