बाबूराव बोरोळे
उपसंपादक
प्रबोधिनी न्युज
महिलांचे पशुसंवर्धनातील योगदान वादातीत आहे. कौटुंबिक जबाबदारीसह पशुपालनातील बहुतांश कार्ये महिला करीत असतात. मात्र त्यांच्या योगदानाला कायम दुय्यम महत्त्व दिले जाते. बहुतांश वित्तीय, विपणन आणि विस्तार सेवेपासून त्या अलिप्त राहतात. ग्रामीण महिला शेळीपालन सहज करू शकतात. त्यांना बचत गट, उत्पादक कंपनी अशा माध्यमातून संघटित करणे आणि त्यांच्यात उद्यमिता रुजविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांनी केले. ते आज उदगीर पशुवैद्यक महाविद्यालयात माविम पुरस्कृत प्रशिक्षण कार्यक्रमात पशुसखीसोबत संवाद साधताना बोलत होते. यावेळी मंचावर माफसुचे संशोधन संचालक डॉ. नितीन कुरकुरे, पशुवैद्यक महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड, मत्स्यविज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ बी. आर. खरटमोल, दुग्धतंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एम. आर. पाटील, प्रकल्प समन्वयक डॉ. धनंजय देशमुख आणि प्रकल्प सह-समन्वयक तथा प्रशिक्षण समन्वयक डॉ. नरेंद्र खोडे उपस्थित होते. कुलगुरू महोदय डॉ. नितीन पाटील आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले की, पशुसंवर्धनात शास्त्रीय पद्धतीचा अवलंब वाढविणे हे एक विस्तार यंत्रणेपुढील मोठे आव्हान आहे. शास्त्रीय पद्धतीचा अवलंब वाढण्यासाठी महिलांचा विस्तार उपक्रमात सहभाग वाढविणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी प्रकट केले. महिला शेळीपालन सहज करू शकतात. त्यांच्यात उद्यमिता रुजवून आणि बचत गट, उत्पादक कंपन्या सारख्या माध्यमातून त्यांना संघटीत केले तर पशुपालनासाठी लागणारी साधन सामग्री खरेदी, विविध सेवांची उपलब्धता, आणि त्यांच्या उत्पादनाचे विपणन सहज आणि अधिक लाभदायक होऊ शकते असे प्रतिपादन त्यांनी केले. प्रसंगी संशोधन संचालक डॉ. नितीन कुरकुरे यांनी नांदेड जिल्ह्यातून प्रशिक्षणासाठी आलेल्या पशुसखींना उद्देशून केलेल्या मार्गदर्शनात म्हटले की, शेळीपालनाचे हे प्रशिक्षण आपणासाठी एक सुवर्णसंधी समजून त्यातून अधिकाधिक ज्ञान आणि कौशल्य अर्जित करण्याचा प्रयत्न करावा. सहयोगी अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड यांनी पशुसखीची प्रशिक्षणे अधिकाधिक प्रभावीपणे आयोजन समिती राबवित असल्याचा विश्वास प्रकट केला. याप्रसंगी “शेळीपालन” आणि “मूरघास निर्मिती तंत्र” याविषयावरील दोन पुस्तिकेचे विमोचन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नरेंद्र खोडे यांनी तर सूत्रसंचलन प्रशिक्षण सह-समन्वयक डॉ. शरद आव्हाड यांनी केले.
प्रकल्प समन्वयक डॉ. धनंजय देशमुख यांनी पशुसखी प्रशिक्षण आणि प्रस्तुत प्रकल्पाची महिला सक्षमीकरणामध्ये असलेली भूमिका विशद केली. कार्यक्रमास डॉ. अशोककुमार देवंगरे, डॉ. गणेश गादेगावकर, डॉ. गोपाल भारकड, आदि समवेत पशुवैद्यकीय, मत्स्यविज्ञान आणि दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, कर्मचारीवृंद आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता डॉ. राम कुलकर्णी प्रशिक्षण सह-समन्वयक यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.

