कपिल मेश्राम
तालुका प्रतिनिधि
सिंदेवाही
*मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रम : सिंदेवाही तालुक्यातील ९१ शाळांचा सहभाग*
: “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” या उपक्रमामध्ये सिंदेवाही तालुक्यातील ९१ शाळांमधून नाचनभट्टी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेने प्रथम क्रमांक पटकविला आहे
नाचनभट्टी जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षकांनी प्रचंड मेहनत घेत शाळेचा गुणात्मक दर्जा उत्तम ठेवला आहे. लोकसहभाग, विद्यार्थ्यांचा शाळा व्यवस्थापन समितीचा सहभाग आणि शिक्षकांची मेहनतीने ही शाळा प्रथम आली आहे. शाळेतील तीन मुख्य शिक्षक व एक शिक्षक डेप्युटेशनचे कार्यरत आहेत . दोन शिक्षकांची जागा रिक्त असतांना शाळेचे मुख्याध्यापक विजयानंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनामध्ये शाळेने प्रगती केली.यामध्ये लोकसहभाग महत्वाचा ठरला. शिक्षक महेंद्र खोब्रागडे, मोरेश्वर नेवारे, अण्णाजी डोंगरवार यांनी अथक परिश्रम घेतले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज मनोहर हनवते यांच्या सह समितीच्या सदस्यांनी शाळेला अधिक वेळ देऊन शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी सहकार्य केले. सरपंच विद्याताई खोब्रागडे, ग्रामविकास अधिकारी घोनमोडे साहेब यांनीही कौतुक केले.
शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांना केलेली स्वच्छता, वर्गाची सजावट, परसबाग, वक्तृत्व व सांस्कृतिक स्पर्धा आणि क्रीडास्पर्धा हे उपक्रम शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून करून घेतलेले उपक्रम या सर्व बाबी तपासून शाळेला अव्वल क्रमांक मिळाला आहे. आतापर्यंत शाळेतून १३ विद्यार्थ्यांची नवोदयकरीता निवड झाली आहे. तसेच शिष्यवृत्तीसारख्या परिक्षेतही शाळेचा सक्रिय सहभाग असल्याने शाळा गुणवत्तेतही अव्वल आहे.गटशिक्षणाधिकारी किशोर पिसे व केंद्रप्रमुख सज्जन तेलकापल्लीवार यांचे शाळेला वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. शाळेने गुणवत्तापूर्ण शिक्षणावर अधिक भर दिला आहे. यासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासासाठी विविध स्पर्धा घेऊन त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न कायम असतो. शाळा आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये ग्रामस्थांचाही मोठा सहभाग आहे. त्यांच्या सहकार्यानेच शाळेला “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” उपक्रमामध्ये प्रथम क्रमांक मिळाला.

