शारदा भुयार
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
कारंजा (लाड) : कारंजा येथून जवळच असलेल्या ग्राम तुळजापूर येथील रहिवाशी, पोलीओमुळे 100 % दिव्यांग असलेल्या कु.ज्योती रमेश इंगोले (पाटील) हिने काही वर्षापूर्वी, दिव्यंगत्वामुळे आणि आर्थिक परिस्थितीमुळे शाळेला राम राम ठोकलेला.परंतु स्वतः दिव्यांग असलेल्या कु.ज्योती रमेश इंगोले (पाटील) हिला भविष्यात जीवन जगतांना,जगाच्या रहाटगाडग्यात बिकट परिस्थितीला तोंड द्यावे लागणार. हे सत्य तिला महाराष्ट्र अपंग संस्था कारंजाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेते असलेले दिव्यांग जनसेवक संजय कडोळे हे वेळोवेळी पटवून देत होते.आणि शिक्षणासाठी आग्रहही करीत होते.परंतु त्यावेळी परिस्थितीमुळे तिला शाळा किंवा महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेता आले नाही.दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी पंधरा विस वर्षापूर्वी तिचे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देण्यापासून तर तिला कारंजा तहसिल कार्यालयामधून,स्व.संजय गांधी दिव्यांग अनुदान दरमहा मिळवून देणे.रोटरी क्लब अकोला मार्फत जयपूरचे कॅलिपर्स,कुबड्या मिळवून देण्यापर्यंत मदत करून स्वावलंबी बनविण्यासाठी हातभार लावला.पुढे काही वर्षांनी,शिक्षणात बराच मोठा कालखंड पडूनही,कु.ज्योती रमेश इंगोले हिला देखील शिक्षणाचे महत्व पटून आवड निर्माण झाली.व ती जिद्दीने उभी राहीली.त्यासाठी तिला तिच्या आईचे देखील प्रेरणादायी सहकार्य लाभले व अखेर तिने आपल्या हितचिंतक गुरुवर्याच्या मार्गदर्शनातून स्व.यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठ नाशिक मधून पूर्वतयारी परिक्षा उत्तिर्ण केली.खाजगीमधून 17 नंबरचा फॉर्म भरून तीने इयत्ता दहावीची परिक्षा उत्तिर्ण केली.सोबतच मुक्त विद्यापिठातून पदवीत्तीर्ण शिक्षण केले.शिवनकलेतही ती पारंगत ठरली.नुकतीच मार्च 2024 मध्ये बारावी परिक्षा देवून ती उत्तिर्ण झाली.बारावी परिक्षेचा निकाल येताच तिने ही खुशखबर सर्वात अगोदर तिचे मामा दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांना म्हणजे मला दिली.त्यावेळी खरोखर आनंदाने माझा ऊर भरून आला.आपण तर तीला काहीच दिले नाही.केवळ शिक्षणासाठी प्रोत्साहित करीत होतो.परंतु ह्या मुलीने आपले स्वप्न पूर्ण केले.आज जरी ती शारिरिक विकलांग असली तरी ती आज स्वतःच्या पावलावर भक्कमपणे उभी रहात आहे.हे बघून जणू मलाच एखादा पुरस्कार मिळाल्याचा आनंद झाला आहे. आणि हा आनंद मी शब्दाने व्यक्त करू शकत नाही.पंख नसलेल्या पक्षाप्रमाणे गगनभरारी घेऊ इच्छिणाऱ्या कु.ज्योती रमेश इंगोले हीची जीद्द आहे. महत्वाकांक्षा आहे त्यामुळे ह्या मुलीचा मला अभिमान वाटतो. हिला शासनाने दिव्यांग आरक्षणा मधून शासकिय नोकरी द्यावी व त्यासाठी समाजातील पुढाऱ्यांनी विशेषतः खासदार आमदार यांनी मदत करावी.अशी आशा दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी व्यक्त केली आहे.कु.ज्योती इंगोले हिचे हार्दिक अभिनंदन !

