बोध सम्यक दृष्टीचा
येथे प्रत्येकास व्हावा
अंधःकार अज्ञानाचा
मन, बुद्धीतून जावा!
आहे जग हे चालले
प्रकृतीच्या नियमाने
नाही होणार बदल
त्यात खोट्या कृत्रिमाने!
आत्मा आणिक मोक्षाच्या
थापा कपोलकल्पित
कर्मकांडाने कधीच
नाही साधणार हित!
चमत्कार, अंधश्रद्धा
यांचा कोण हा बाजार….
पौराणिक वानग्यांना
नाही तार्किक आधार!
जिणे आनंदी जगाया
आधी दृष्टी हवी शुद्ध
वाट प्रकाशाची आम्हा
गेले दावूनिया बुद्ध!
कवी महादेव भोकरे
वडूज (सातारा)

