ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे जिल्ह्याला 20 अग्नीशमन बाईक

0
79

अरुंद गल्ल्या, झोपडपट्ट्यांमधील आग नियंत्रणात आणणे होणार शक्य

कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर – चंद्रपूर, दि. 2 – राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूर जिल्ह्याला 20 अग्नीशमन बुलेट (बाईक) मिळाल्या आहेत. लवकरच ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते या बाईक्सचे लोकार्पण होईल.

अरुंद गल्ली-बोळ्यांमध्ये तसेच झोपडपट्यांमध्ये आगीच्या घटना घडल्यास त्या ठिकाणी अग्नीशमन वाहने पोहोचू शकत नाहीत. अश्यात मोठ्या प्रमाणात जीवित हानी व वित्त हानी होते. त्यावर उपाय म्हणून राज्य सरकारने आग विझविणाऱ्या बुलेट्स (बाईक) उपलब्ध करून दिल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत यांना आग विझविणाऱ्या एकूण 20 बाईक्स देण्यात आल्या आहेत. ना. मुनगंटीवार यांनी ही यंत्रणा जिल्ह्याला उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत मंत्री मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.

वॉटर मिस्ट रॅपिड फायर फायटिंग बाईक्स आणि कॉम्प्रेस्ड एअर फोम बाईक्स अश्या दोन प्रकारच्या दुचाकी आहेत. यामध्ये भिसी, ब्रह्मपुरी, चिमूर, गडचांदूर, घुग्घुस, गोंडपिंपरी, जिवती, कोरपना, मुल, नागभीड, पोंभुर्णा, राजुरा, सावली आणि सिंदेवाही या शहरांसाठी प्रत्येकी 1 वॉटर मिस्ट्र रॅपिड फायर फायटिंग बाईक्स (दुचाकी) देण्यात येणार आहेत. तर बल्लारपूर, वरोरा आणि भद्रावतीसाठी प्रत्येकी 2 कॉम्प्रेस्ड एअर फोम बाईक्स (दुचाकी) देण्यात आल्या आहेत.

असा होणार उपयोग
छोट्या स्वरुपात लागलेल्या आगीच्या ठीकाणी तातडीने वापरता येणारी प्रथम प्रतिसाद यंत्रणा म्हणून या दुचाकीचा अत्यंत प्रभावी वापर होणार आहे. तेल व गॅसमुळे लागलेली तसेच विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेली आगही या दुचाकीद्वारे विझवता येणार आहे. ज्या ठिकाणी फायर टेंडरच्या गाड्या पोहोचू शकणार नाहीत, अशा अरुंद गल्ली बोळात तसेच झोपडपट्टीमध्येही या दुचाकी सहज पोहोचू शकतात व भडकणा-या आगीवर 3 ते 12 मीटर अंतरावरुन तसेच 30 फूट उंचीपर्यंत मिस्ट (Mist) स्वरुपात फवारा मारु शकतात. यामध्ये पाण्यासोबतच रासायनिक फोमचा वापर केल्यामुळे आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवणे सहज शक्य होणार आहे.

ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार लोकार्पण
चंद्रपूर जिल्ह्याला देण्यात आलेल्या एकूण २० बाईक्सचे लोकार्पण ना. सुधीर मुनगंटीवार यांनी करावे, अशी विनंती मदत व पूनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे. ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत प्रशासनाला या बाईक्स देण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here