लातूर जवळील उड्डाणपूला जवळच मुरमा ऐवजी होतोय लाल मातीचा वापर !!!
लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी केली केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे तक्रार
लातूर प्रतिनिधी:- लातूर महानगरपालिकेच्या हद्दीपासून थोड्या अंतराचे काम पावसाळा सुरू झाल्यावर सुरू करण्यात आले आहे. या सुरू झालेल्या कामात चांगल्या मुरमाऐवजी चक्क कुस्तीच्या फडात टाकायच्या लाल मातीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याचे दिसत आहे.
राष्ट्रीय महामार्गाचे इंजिनियर, लोकप्रतिनिधी यांची या कामाकडे डोळे झाक का आहे ? असा प्रश्न लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी केला आहे.
लातूर ते टेंभुर्णी हा रस्ता सोलापूर ते धुळे आणि सोलापूर ते पुणे या दोन राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा असा राष्ट्रीय महामार्ग आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हा रस्ता असून, त्याच्या चौपदरीकरणाचे काम अनेक वर्षांपासून रखडलेले होते. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी चौपदरीकरणाच्या कामाला २०२१ मध्ये मंजुरी दिली, तरी टेंभुर्णीपासून येडशीपर्यंत केवळ दहा मीटर रुंदीचे, तर लातूरपासून येडशीपर्यंत कुठे चौपदरी, तर कुठे सात मीटर रुंदीचे काम करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी साडेपाच मीटर रुंदीचाच रस्ता असून ठिकठिकाणी या रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डेही पडलेले आहेत.
रस्त्याची दुरवस्था झाल्याने लातूरहून पुणे व मुंबईला जाणारी बहुतांशी वाहने ही सोलापूरमार्गे जाणेच पसंत करतात.
आता पावसाळ्यात लातूर पासून मांजरेश्वर हनुमान मंदिरापर्यंत चौपदरीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाने हाती घेतले असून एका बाजूने हा रस्ता खोदून ठेवून वाहतुकीची कोंडीच करून ठेवली आहे.
या सुरू असलेल्या रस्त्याचे कामही अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून या कामात चांगला मुरूम वापरण्याऐवजी चक्क लाल माती भरत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. मुरूम भरण्यासाठी खोदलेल्या रस्त्यावर पाणी असतानाही त्याचा उपसा न करताच त्यावर लालमाती टाकून व दगडाचे थर देऊन रोलर फिरवले जात आहे. त्यामुळे या रस्त्याचे लवकरच बारा वाजल्या शिवाय राहणार नाहीत, असेही लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी हे राष्ट्रीय महामार्गाचे रस्ते शंभर वर्षे टिकतील एवढ्या गुणवत्तेची कामे होत आहेत, असे म्हणत असताना एवढे बोगस काम झाल्यावर पाच वर्षे सुद्धा टिकणार नाहीत हेही तितकेच स्पष्ट आहे.
एवढे बोगस काम चालू असताना राष्ट्रीय महामार्गाचे शाखा अभियंता दत्ता वाघ कुठल्या गुहेत झोपले आहेत ? का कोणाच्या दडपणाखाली दुर्लक्ष करत आहेत असाही प्रश्न लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी विचारला आहे.

