सोनाली घाटगे महिला उपसंपादक प्रबोधिनी न्युज – ठाणे दि. १३- जिल्हा परिषद ठाणे, प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या कालावधीसाठी मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये पात्र उमेदवारांची उपशिक्षक, पदवीधर शिक्षक या पदावर एकत्रित मानधन तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने नियुक्ती करण्यासाठी समक्ष अर्ज मागविण्यात आले आहे. याबाबत शिक्षण विभागाकडील पुर्वीची जाहिरात फक्त सेवानिवृत्त शिक्षकासाठी होती परंतू शिक्षण विभाग प्राथमिक यांच्याकडील दि. १३ ऑगस्ट २०२४ मधील सुधारीत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ती जाहिरात जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दि. १३ ऑगस्ट २०२४ मधील सुधारीत जाहिरातीत प्रस्तावित केल्यानुसार शैक्षणिक अर्हता व इतर बाबी दिलेल्या आहेत.
एकत्रित मानधनावर कंत्राटी पध्दतीने शिक्षक नेमणूका या पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये नियमित शिक्षक भरती होईपर्यंत करण्यात येत आहेत. उमेदवाराचे नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष असणे आवश्यक आहे. मासिक मानधन रुपये २०,०००/- प्रतिमाह (इतर कोणतेही लाभाव्यतिरिक्त) दिले जाईल.
इच्छुक उमेदवारांनी अर्ज दि. १४ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट या कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत ठाणे जिल्हयातील आपल्या लगतच्या / सोयीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालय, पंचायत समिती अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड व शहापूर या कार्यालयात जमा करावेत. तसेच अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती पडताळणीसाठी सादर करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी जाहिरात व अर्जाचा नमुना जिल्हा परिषद ठाणेच्या https://zpthane.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे.

