आजचा लेख – स्त्री जन्मा तुझी कहाणी

0
299

आजचा लेख – स्त्री जन्मा तुझी कहाणी

स्त्री म्हणजे परमेश्वराने निर्माण केलेली सुंदर कलाकृती आहे.स्त्री अनेक रूपात वावरत असते.ती आई असते, भगिनी असते, बायको असते, मैत्रीण असते.आजची स्त्री मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहे.असे असले तरी कित्येक स्त्रियांना आजही कुटुंबात अत्याचार सहन करावा लागतो.ती अनेकदा चूल आणि मूल यापलीकडे स्वतःसाठी काहीच करू शकत नाही.आपल्याला माहित आहे की पूर्वी स्त्रियांना अनेक बंधने होती.तिला शिक्षणाचा अधिकार नव्हता.तिला घरातही मानाचे स्थान नव्हते.तिला पुरूषप्रधान समाजात केवळ उपभोगाची वस्तू म्हणून पाहिल्या जात असे.आजही ही परिस्थिती फारशी बदललेली नाही.आजची स्त्री तर उलट जास्त असुरक्षित झाली आहे असं म्हणावं लागेल.कमीतकमी पूर्वी स्त्रिया घरात राहत असल्याने ब-याच प्रमाणात सुरक्षित होत्या.पण आज जेव्हा त्या घराबाहेर पडतात तेव्हा अनेक गिधाडांची वाईट नजर त्यांच्यावर असते.जगातील सर्वच क्षेत्रात गगनभरारी घेणा-या स्त्रिया आजही सुरक्षित नाही.समाजात बलात्कारासारख्या अमानुष घटना रोज घडत आहेत.टिव्ही, वर्तमानपत्रात याच बातम्या रोज वाचण्यात येतात.अगदी लहान मुलींवरही नराधम बलात्कार करताना आपण वाचत,ऐकत असतो.स्त्री मुक्तीवर अनेक भाषणे केली जातात, रॅली काढल्या जाते, मेणबत्त्या पेटवून रस्त्यावर उतरून आंदोलने केल्या जातात.हे सर्व करून ज्यांच्यावर अत्याचार होतो त्या स्त्रियांना किंवा मुलींना खरंच न्याय मिळतो का ?
ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळे स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळाला.लग्नाआधी मुलीची जबाबदारी पूर्णपणे मात्यापित्यावर असते.मुलीचे लग्न झाले की तिची संपूर्ण जवाबदारी तिच्या नवऱ्याची आणि सासरच्या लोकांची असते.पण आजही समाजात अनेक ठिकाणी सासरच्या मंडळींकडून मुलीचा आतोनात छळ करण्यात येतो.तिला मारहाण केली जाते.तिला हुंड्यासाठी त्रास दिला जातो.मुली शिकल्या असल्या तरी तिला सासरी काडीचीही किंमत दिली जात नाही.तिला सतत शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जातो.तिला तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो.आपल्या आईवडीलांना त्रास होऊ नये म्हणून ती मुलगी सारं काही सहन करत असते.जेव्हा तिचा नवराही सासरच्या मंडळींकडून असतो तेव्हा अशावेळी ती एकटी पडते.तिला समजून घेणारं कुणीच नसतं.तिला जगणं फार अवघड होऊन जातं.कित्येक मुली तर सासरच्या त्रासाला कंटाळून आपले जीवन संपवतात.घरातच जेव्हा स्त्री सुरक्षित नसेल तर समाजात ती सुरक्षित कशी राहणार? स्त्रियांना शक्यतोवर घटस्फोट नको असतो.त्याकरीता त्या खूप तडजोड करतात.त्या अत्याचार सहन करतात पण घटस्फोट घेत नाही.क्वचितच महिला घटस्फोट घेतात.स्त्रियांच्या कपड्यांवरही ताशेरे ओढले जातात.अगदी साडी नेसणा-या स्त्रियांवरही बलात्कार होतात.काय म्हणावे याला? हा स्त्रियांनी घातलेल्या कपड्यांचा दोष नाही तर बुरसटलेल्या पुरूषी मनाचा आहे.स्त्रीला कौटुंबिक, सामाजिक स्तरावर मानाचं स्थान मिळायला हवं.तीही माणूस आहे, तिलाही एक मन आहे याची जाणीव समाजाला व्हायला हवी.ही जाणीव जोपर्यंत समाजाला होत नाही तोपर्यंत पशूवत वागणूक देणे बंद होणार नाही.
मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेत दोन स्त्रियांना निर्वस्त्र करून रस्त्यावरून फिरवलं गेलं.अतिशय माणुसकीला लाजविणारा हा प्रकार घडला.आपण फक्त अशा घटनांविषयी हळहळ व्यक्त करतो.कालांतराने अशा घटनांचा विसर आपल्याला पडतो.सर्व नंतर आपापल्या कामाला लागतात.सर्व जैसे थे होऊन जातं.आजच्या स्त्रियांनी ‘फर्श से अर्श तक’ मजल गाठली आहे.तरी ती अनेकदा हतबल होते, नव्हे तिला हतबल केलं जातं.स्त्रियांची विटंबना आजच्या काळातच होते आहे असं नाही.रामायण, महाभारत काळातही तिची विटंबना केली गेली.सीतेलाही अग्निपरीक्षा द्यावी लागली.द्रौपदीचे भर सभेत कौरवांकडून वस्त्रहरण केले गेले.तेव्हापासून तर आजपर्यंत आपला समाज केवळ बघ्याची भूमिका पार पाडतो आहे.स्त्रियांवर जेव्हा बलात्कार होतात तेव्हा स्त्रीचा दोष नसतानाही तिला समाज यासाठी जबाबदार धरतो.विकृत मानसिकतेचा पुरूष मात्र उजळ माथ्याने समाजात वावरत असतो.कित्येक स्त्रिया तर समाजात आपली बदनामी होईल या भीतीमुळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करीत नाही.मग अशावेळी बलात्कारी वारंवार त्या स्त्रिचा फायदा घेतो.स्त्रियांच्या वेशभूषेला, केशभूषेला बलात्कारासाठी समाजाकडून कारणीभूत ठरवलं जातं जे अगदी चुकीचं आहे.
समाज भावनाशून्य झाला आहे.स्वत:ला माणूस म्हणवून घेण्याची खरंतर आपल्याला लाज वाटली पाहिजे.आपल्याकडे कायदे कठोर नाहीत.कोर्टात अनेक वर्षे केसेस चालतात.सौदी अरेबिया सारखे कठोर कायदे आपल्याकडे हवेत.जेणेकरून गुन्हेगाराला गुन्हा करताना हजार वेळा विचार करावा लागेल.बलात्कारासारखे गुन्हे समाजात घडू नये यासाठी प्रत्येक
कुटुंबाने आपल्या घरातील मुलांवर चांगले संस्कार करणे गरजेचे आहे.मुलींना भोगवस्तू न समजता त्यांच्याकडे सन्मानाने पाहायला मुलांना शिकविण्याची आज नितांत गरज आहे.आता स्त्रिलाच लढण्यासाठी सज्ज व्हायला हवे.तिला वाचवायला श्रीकृष्ण येणार नाही. स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांची नांगी ठेचणे आवश्यक आहे.तेव्हाच या नराधमांना चांगली अद्दल घडेल.

स्त्री जन्मा तुझी कहाणी
हृदयी पान्हा नयनी पाणी

कवियत्री – लैलेशा भुरे
नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here