prabodhini news logo
Home लेख आजचा लेख – स्त्री जन्मा तुझी कहाणी

आजचा लेख – स्त्री जन्मा तुझी कहाणी

0
247

आजचा लेख – स्त्री जन्मा तुझी कहाणी

सर्वप्रथम मी या विषयावर लिहावयास मिळाले,आणि रसिक वाचकांपर्यंत पोहोचले म्हणुन आयोजकांचे व संपादकांचे धन्यवाद मानते.
गृहिणी/स्त्री हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय विशेषतः सर्वं वर्गांचा.कारण,जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात “जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे ” प्राचीन काळापासून स्त्रीला दुय्यम दर्जा दिल्याचे दिसुन येते पूर्वी तर चूल आणि मुलं एवढंच तिचं जग होतं, तिला पतीचे निधन झाले तर सती जावे लागतं होते ती प्रथा समाज सुधारकांनी मोडून काढली,त्यांचे शतशः धन्यवाद. विधवा म्हणुन जगताना केशवपन करणे, तसेच हीन वागणूक देणे. तिला कसलेच स्वातंत्र्य नव्हते. याही विघातक प्रथा बंद झालेल्या दिसतात.
सध्याच्या युगात स्त्री शिकली, घराबाहेर पडली अर्थार्जन करू लागली पण अजुनही ती खऱ्या अर्थाने स्वतंत्र, सुरक्षित, सन्माननीय आहे का ?? हा प्रश्न निरुत्तरीयच आहे.
मुळातच स्त्री ही परक्याचे धन म्हणून जन्माला येते. लहानपण वडिलांच्या घरी, लग्नानंतर तरुणपण नवऱ्याच्या घरी, आणि म्हातारपण मुलाच्या घरी, आपले स्वतःचे आयुष्य जगत असते. तिचे स्वतःचे असे काहीच नसते ती मात्र कुटुंबात सर्वासाठी हक्काचं आगार असते.
लहानपणापासूनच तिला स्वयंपाक बनवणे घरातील इतर सर्व गृहिणीची कामे शिकवली जातात ‘बाई तुला सासरी नांदायचं आहे’ सर्व काही आलं पाहिजे नाहीतर आम्हाला लोकं दोष देतील असं म्हणून तिच्यावर लहानपणापासूनच गृहिणीचे लेबल लावले जाते. निसर्गाने तिला उपजतच प्रचंड सहनशक्ती दिलेली आहे. त्या जोरावर तिची सुर्य उगवायच्या आधीपासून दिवसाची सुरवात होऊन चंद्र डोक्यावर येईपर्यंत दिवसाचा शेवट होतो. घरातील सर्वं कामे ती कमीपणा न समजता करते. ते तिचे कर्तव्य समजून यशस्वी रित्या पार पाडते, पण त्याच्या मोबदल्याचा कधीही विचार करत नाही. उलट जी गृहिणी तारेवरची कसरत करत नोकरी सांभाळत उत्तम घर सांभाळते अर्थार्जन करते तिच्या पगाराची अपेक्षा मात्र कुटुंब करते.मग ती सन्मानीत आहे काय?म्हणजे तिने केलेल्या कामाचा सन्मान न होता तिचं कर्तव्यच आहे अशी समज दिली जाते. स्वतःच्या देहाची लक्तर होईपर्यंत ती कुटुंबातील सर्वांची, नातेवाईक, आले गेले यांची काळजी घेत असते. हे करताना आपलेपणा असतो माया प्रेम ओसंडून वाहत असते. केलेल्या कामाचं कधीही मूल्यांकन करत नाही. घरासाठी अर्थार्जन करते, कधी पैशाची बचत करते तेव्हा ती लक्ष्मी असते, घराचं रक्षण करते तेव्हा दुर्गा शक्ती असते,मुलांचा अभ्यास घेते त्यांच्यावर संस्कार करते तेव्हा सरस्वती असते. ही तिनही रूपे जिच्यात समाविष्ट असतात ती गृहिणी,संसाररूपी रथ चालवणारी समतोल साधणारी, सुख दुःखात सहभागी होऊन परिस्थितीला आपलंसं करणारी अर्धांगिनी असते.
तरीही तिला काही मर्यादा असतातच. तिला समाजाच्या चौकटीत राहूनच वर्तन करावे लागते.
मला इथे सांगायचं आहे की तिच्या कामाची कदर करावी आणि कधीही अनादर करू नये,हेटाळणी करू नये. ती आहे म्हणून घर व्यवस्थित आहे जिथल्या तिथे सर्व काही आहे घर प्रसन्न आहे घर हसत -खेळत आहे. घराला घरपण आहे.
आता महत्वाचा मुद्दा आवर्जून सांगावा वाटतो, की एकविसाव्या ह्या डिजिटल युगात स्त्रियांनी जवळ जवळ सर्वच क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन अतिशय उत्कृष्ट पणे कार्यरत असते. पण ती स्त्री म्हणुन तिच्या कडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन अजुनही बदलत नाही. वासनांध नजरा, लचके तोडणारी गिधाड, लैंगिक शोषण, पैशासाठी छळ,हत्या, कमी लेखणे इ. गोष्टींना सामोरे जावे लागतं आहे. ही या आधुनिक युगातील एक शोकांतिका आहे असं म्हंटल तर वावगं ठरेलं असं वाटतं नाही. हे पूर्वी पासूनच आपण पाहत आलो आहे मग द्रौपदी वस्त्रहरण असो किंवा सीतेची अग्नी परीक्षा असो. किंवा अलीकडे घडणाऱ्या भयंकर निर्भया सारख्या कित्येक घटना आहेत कधी तिला गर्भातच मारून टाकले जाते, कधी कोवळी कळी खुडून टाकली जाते,कधी विद्यार्थिनीवर अमानुष अत्याचार. एक का दोन कितीप्रकारे तिची हेटाळणी केली जाते, मग ती सुरक्षित आहे का?हिच आहे काय तिच्या जन्माची कहाणी ? एकीकडे तिला अनंत काळाची माता म्हणुन लेबल असतं तरं दुसऱ्या बाजूला तिला साधन म्हणुन हिणवलं जातं. स्त्री म्हणजे सहन करणारी, तिला गृहित धरलं जातं. हे साफ चुकीचे आहे.तर हे सर्वं थांबण्यासाठी स्त्रीच्या रक्षणासाठी कडक कायदे झाले पाहिजेत तिला स्वरक्षणासाठी काही विशेष प्रकारच्या सुविधा दिल्या पाहिजेत. आणि स्त्रियांनी स्वतः याचा पाठपुरावा करावा असें वाटते. कारण आता सुदर्शन सारखा कोणी पाठीराखा या युगात राहिलेला दिसत नाही, नव्हे नाहीच. तरी स्त्रीलाच रणरागिणी होऊन दुष्टांना संपवायचं आहे, स्वतःच ढाल होऊन स्वतःच रक्षण करायचं आहे.
हे सत्य होऊ पाहतंय. हिच नवीन कहाणी बनवायची आहे.
शेवटी एवढंच सांगायचं आहे तिही एक माणुस आहे.तिच्या भावनांचा आदर केला पाहिजे. तीला मनासारखं वागता आलं पाहिजे. तिच्या रक्षणासाठी तिला धडे दिले पाहिजेत. तिला स्वायत्ता दिली पाहिजे. ‘पर स्त्री मातेसमान ‘हे बाळकडू सर्वं मुलांना, पुरुष वर्गाला, समाजाला दिलं पाहिजे. हिच अपेक्षा लेखणीची आहे.
समस्त स्त्रिया, समाज बांधव कायदा सुव्यवस्था आणि सामाजिक बांधिलकी या सर्वांनी मनन चिंतन केलं पाहिजे. आणि या शक्ती देवतेला हृदयापासून सलाम केला पाहिजे.

कवियत्री – सौ. वसुंधरा निकम, सातारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here