पी.एम. जनमन योजनेअंतर्गत आदिम कोलाम लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप

0
52

प्रबोधिनी न्युज नेटवर्क – चंद्रपूर : बिरसा मुंडा जयंती निमित्त आदिम जमातींच्या विकासाकरिता पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री जनजाती आदिवासी महान्याय अभियान अर्थात पी. एम. जनमन योजनेची मागच्या वर्षी सुरुवात करण्यात आली होती. आता या योजनेचा दुसरा टप्पा 25 ऑगस्ट 2024 पासून सुरू झाला असून जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समिती स्थापन झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील अभियानाची सुरुवात जिवती, राजुरा आणि कोरपना या आदिम बहुल तालुक्यांतून विविध सेवांच्या आयोजनाने करण्यात येत आहे.

त्यानुसार कोरपना तालुक्यातील एकूण 430 लाभार्थ्यांना, राजुरा तालुक्यातील 54 आणि जिवती तालुक्यातील 509 लाभार्थ्यांना जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, आयुष्यमान भारत कार्ड, जॉबकार्ड, आरोग्य तपासणी, आधार कार्ड नुतनीकरण, पी.एम. किसान योजना, विद्युत जोडणी, मतदार कार्ड, रेशन कार्ड, संजय गांधी योजना, अधिवास प्रमाणपत्र जनधन खाते अशा विविध योजनांचा लाभ मिळालेला आहे.

या अभियानांतर्गत प्रथम चरणात वंचित राहिलेल्या जिवती, राजुरा, आणि कोरपना या आदिम बहुल तालुक्यांतील लाभार्थ्यांना आधार कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, जातीचे दाखले, जनधन खाते, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले, मतदान कार्ड, किसान क्रेडिट कार्ड, रेशन कार्ड इत्यादी ‍विविध दाखले शिबिरांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आदिम जमातीतील कुटुंबांना पक्के घर, नल से जल योजनेअंतर्गत स्वच्छ पिण्याचे पाणी पुरविणे, पाडे व वस्त्यांना रस्त्याने जोडणे, प्रत्येक घराला वीज जोडणी उपलब्ध करुण देणे, पोषण आहार आणि आरोग्य सुविधा, वस्त्या, पाडे मोबाईल आणि इंटरनेट सुविधेने जोडणे, बेरोजगारांसाठी कौशल्य विकास योजना राबविणे, उपजिविका साधनांची निर्मिती करणे, वैयक्तिक वनहक्क दावे धारकांना पीएम – किसान योजनेचा लाभ देण्यात येत आहे. सदर अभियान जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे मार्गदर्शनात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांचे समन्वयाने आणि संबंधित सर्व शासकीय विभागांचे सहकार्याने 27 ऑगस्ट 2024 पासून पार पडत आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर द्वारे जिल्ह्यात आदिवासींसाठी 10 सप्टेंबर 2024 पर्यंत राजुरा, कोरपना व जिवती तालुक्यात अशा शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या योजनांचा तसेच वरील ठिकाणी असलेल्या शिबिराला आदिम समुदायाने उपस्थित राहून आवश्यक योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here