
दिपाली पाटील जिल्हा उपसंपादक चंद्रपूर- ऊर्जानगर(चंद्रपूर):-चिमूर – आष्टी क्रांतीच्या शहिदांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यासाठी तसेच त्यांच्या कार्याच्या स्मृतींना उजाळा देऊन आजच्या पिढीला तो प्रेरणादायी इतिहास माहीत व्हावा म्हणून श्री गुरुदेव सेवा मंडळ,ऊर्जानगर तर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ ला सामुदायिक प्रार्थना झाल्यानंतर स्मृतिदिन कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मा. रामदास तुमसरे (अध्यक्ष श्री गुरुदेव सेवा मंडळ,ऊर्जानगर) यांनी भूषविले प्रमुख मार्गदर्शक आस्वले गुरुजी चिंचाळा ( राष्ट्रसंत साहित्य अभ्यासक तथा रंगमुक्त होळी चळवळीचे प्रणेते),उद्घाटक ज्येष्ठ गुरुदेव उपासक मा. विठ्ठलराव देठे, भद्रावती प्रमुख अतिथी राजेंद्र लांडे अमरावती, सरस्वती धमाने ज्येष्ठ उपासिका वर्धा,सविता हेडाऊ अध्यक्षा श्रीगुरुदेव सेवा महिला मंडळ यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व अधिष्ठानाला व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले मा.आस्वले गुरुजी यांनी १८५७ च्या उठवाचा उल्लेख करताना तत्कालीन परिस्थिती सापेक्ष जहाल व मवाळ अशी दोन टोकाची भूमिका घेणारे गट निर्माण झाले होते. त्यातील मवाळ गटाचे नेतृत्व लोकमान्य बाल गंगाधर टिळक करीत होते. त्यांच्या मृत्यू पश्चात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याकडे नेतृत्व आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी इंग्रज चले जावचा नारा दिला आणि भारतात क्रांतीची मशाल पेटविल्या गेली. याच क्रांतीला महाराष्ट्रात विशेषत्वाने विदर्भात क्रांती नायक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या ओजस्वी भजनाने विशाल क्रांतीचे स्वरूप आणून दिले.
झाड झडूले शस्त्र बनेंगे,
भक्त बनेगी सेना।
पत्थर सारे बम बनेंगे
नाव लगेगी किनारे।
या शब्दांनी इंग्रजांच्या पायाखालची जमीन सरकली व २८ ऑगस्ट १९४२ ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अटक करण्यात आली अशी माहिती दिली.तसेच मंडळाद्वारा रंगमुक्त होळी ही ५ गावांमधून सुरू झालेली चळवळ आज ५० गावांमध्ये जाऊन पोहचली आहे. हे यश श्री गुरुदेव सेवा मंडळाचे आहे याचाही त्यांनी उल्लेख केला.
प्रमुख अतिथी राजेन्द्र लांडे,धमाणे काकू,सविताताई हेडाऊ यांनी आगष्ट क्रांतिदिनावर यातोचीत विचार प्रगट केले.
अध्यक्षीय भाषणात रामदास तुमसरे यांनी खेड्यामध्ये काम करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. शिक्षक हा समाजाचा पाया असून त्यावरच देशाची प्रगती अवलंबून असते. डॉक्टर फक्त एका आजारावर उपचार करतो परंतु शिक्षक समाजाच्या सगळ्या आजारावर नियंत्रण मिळवून उपचार करू शकतो असे म्हटले.ऑगस्ट क्रांतीचे प्रणेता राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज असले तरी लोकलढ्याचे कर्णधार हे लोकच होते म्हणून शहिदांना लोकनायक म्हणून उल्लेख करावा लागेल असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे संपूर्ण प्रयोजन, आयोजन व नियोजन महिलांनी सांभाळल्याबद्दल आनंद व्यक्त केले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ,श्रीक्षेत्र गुरूकुंज आश्रम द्वारा संचालित ग्रामगीता जीवन – विकास ” प्रवीण परीक्षा ” उत्तीर्ण उपासक व उपासिकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशालीताई डूडूरे यांनी केले तर
प्रास्ताविक मालूताई कोंडेकर व आभार मनीषाताई दुर्गे यांनी मानले. शेवटी ऑगस्ट क्रांतीतील शहिदांना श्रद्धांजली वाहून तसेच राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सदर कार्यक्रमाला चिंचाळा व ऊर्जानगर येथील बहुसंख्येने गुरुदेव सेवक, सेविका उपस्थित होते.














