समाज भवनाच्या माध्यमातून ज्येष्ठांच्या अनुभवी विचारांची देवाण-घेवाण व्हावी – आ. किशोर जोरगेवार
प्रियंका मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर- येथे तयार करण्यात आलेले प्रबुद्ध ज्येष्ठ नागरिक संघाचे समाजभवन ही केवळ एक इमारत नाही, तर आपल्या समाजाच्या एकतेचे आणि आदराचे प्रतीक आहे. या समाजभवनाच्या माध्यमातून आपल्याला एकत्र येण्याची, विचार मंथन करण्याची आणि सामाजिक विकास साधण्याची संधी मिळणार आहे. यातून ज्येष्ठांच्या अनुभवी विचारांची देवाण-घेवाण व्हावी, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
नगिनाबाग येथे स्थानिक आमदार निधीतून भव्य समाजभवन तयार करण्यात आले आहे. या समाजभवनाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी द्वोपती कातकर, श्रीकांत भट्टळ, विजय चंदावार, हरिदास देवगडे, प्रदीप अडकीने, विठ्ठल मून, पोर्णिमा जुलमे, भास्कर मून, लता बहादे आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, शहरातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांचा विकास करण्याचा आपण संकल्प केला आहे. यातील बहुतांश सर्वच ज्येष्ठ नागरिक संघांना आपण निधी उपलब्ध करून दिला आहे. यातून या ज्येष्ठ नागरिक संघांचा विकास होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांचे विचार समाजासाठी उपयोगी आहेत, त्यामुळे त्यांच्या विचारांची देवाण-घेवाण होण्यासाठी त्यांना मंच उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिक म्हणजे आपल्या समाजाचा अमूल्य ठेवा आहे. त्यांच्या अनुभवाची, ज्ञानाची आणि त्यांच्याविषयी असलेल्या आदराची महती आपल्या जीवनात महत्त्वाची आहे. हे समाजभवन म्हणजे त्यांच्यासाठी एक सन्मानाची जागा आहे. येथे ते एकमेकांशी संवाद साधू शकतील, विचारांची देवाण-घेवाण करू शकतील आणि त्यांच्या जीवनाचे अनुभव इतरांपर्यंत पोहोचवू शकतील.
या भवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शांती, प्रेम आणि बंधुभाव यांची अनुभूती होईल, अशी अपेक्षा आहे. तथागत गौतम बुद्धांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपण येथे अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करू शकू. आपण सर्वांनी या भवनाचा वापर समाजातील एकता आणि प्रगतीसाठी करावा. हे भवन आपल्या समाजाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया घालण्यासाठी मोलाचे ठरेल, असेही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात अनेक ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांसह स्थानिक नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

