ठेकेदार फरार ? प्रशासनाचे दुर्लक्ष !
इंदापूर (जाचकवस्ती) महेश कदम : दि. 25, इंदापूर तालुक्यातील मौजे जाचकवस्ती येथे संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग लगत असलेल्या प्रवीण थोरात ते गणेश पाटोळे यांच्या घरापर्यंत असलेल्या 20 फुटी अंतर्गत रोड वर होत असलेल्या बंदिस्त गटार कामाचा (ड्रेनेज) आणि येथील रस्त्याचा चिखल झाल्याची चर्चा ग्रामस्थामधून होत आहे…
सदरचे काम सुरु करत असताना येथील नागरिकांच्या सुरक्षेची कोणतीच काळजी घेतलेली दिसत नाही त्यामुळे येथील 2 लहान मुलं आणि वयोवृद्ध महिला यांना इजा झाली आहे… येथील कामासाठी ज्या पाईप आणल्या आहेत त्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या असल्याची चर्चा ग्रामस्थामधून होत आहे..
पावसाळा सुरु असल्याने याठिकाणी एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सदरचे काम होत असलेल्या ठिकाणी दररोज वाहने अडकण्याचं सत्र सुरु असून त्यामुळे वाहनाचे देखील मोठया प्रमाणात नुकसान होत आहे…
संबंधित गटार कामाची कोणतीही परवानगी नसताना आणि सदरच्या कामाचे कोणतेही एस्टीमेट नसताना ठेकेदाराने महोदयांनी काम सुरूच केले कसे? असा प्रश्न येथील ग्रामस्थान्ना पडला आहे…
याबद्दल ठेकेदाराला विचारले असता संबंधित ठेकेदार उडवा उडवीची उत्तरे देत असून कोणतीही कागदपत्रे दाखवण्यासाठी तयार नाही…येथे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असलेले काम पाहून येथील रहिवाशी यांनी सदरचे काम थांबवले आहे.
परंतु ठेकेदाराच्या पराक्रमामुळे येथील रस्त्याची मोठी दुरावस्था झाल्याने नागरिकांची येण्या-जाण्याची मोठी गैरसोय झाली आहे… ठेकेदाराने संपूर्ण रस्त्यावर मुरूम न टाकता काळी माती टाकून वाहधारकांची मोठी गैरसोय केली आहे…अडकलेली वाहने अक्षरशः ट्रॅक्टरने काढावी लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. वारंवार सांगून देखील ग्रा.पं. प्रशासन दखल घेत नसल्याने येथील नागरिकांचे प्रचंड मानसिक, आर्थिक नुकसान होत आहे.
सदरच्या कामाबद्दल ग्रामपंचायत प्रशासनाकडे कोणतीच अधिकृत माहिती नसल्याचे सरपंच प्रतिनिधी महेश निंबाळकर (महिला सरपंच यांचे पती) आणि ग्रामविकास अधिकारी संदीप सोडमिसे ग्रा.पं. जाचकवस्ती यांच्याकडून सांगण्यात येत आहे…ही बाब अत्यंत गंभीर असून याकडे ग्रा.पं.प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
आता तरी ग्रा.पं. प्रशासन या प्रकरणाची दखल घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

