आरमोरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – कर्मवीर विद्यालय तथा कला कनिष्ठ महाविद्यालय,वासाळा (ठाणेगांव ) तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुनील मेश्राम, पर्यवेक्षक प्रमोद दिघोरे, प्रा. मनोज आलबनकार , शेषराज खोब्रागडे, लालचंद शिखारमे, भास्कर उरकुडे उपस्थित होते. तर या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रा.नानाजी रामटेके उपस्थित होते.
प्रा.नानाजी रामटेके यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना सांगितले की,रवींद्रनाथ टागोरांनी ज्यांना सर्वप्रथम महात्मा ही उपाधी दिली, ते महात्मा गांधी.अन्याय हीच सर्वात मोठी समस्या आहे.अन्याय सहन करणे म्हणजे हिंसेमध्ये सामील होणे.गांधीजी २० व्या शतकातल्या भारतीय संस्कृतीतील सर्वश्रेष्ठ रूप आहे.गांधीजींना कोणीतरी विचारलं तुमच्या आयुष्याचा संदेश सांगा.त्यावर गांधीजी म्हणाले, ” माझं जीवन हाच माझा संदेश.”
लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याचे महत्त्व विशद करताना त्यांनी सांगितले की,अगदी लहानपणापासूनच त्यांची प्रतिमा एक मृदू स्वभाव आणि सच्चा ईमानदार अशी झाली होती.लालबहादूर परिस्थिती जशी समोर येईल त्याप्रमाणे वागत सत्यापासून ते कधीही ढळले नाहीत. त्यांच्यासमोर अनेक संकटे नेहमीच उभी राहिली ; परंतु त्यांनी त्यावर जमेल तशी मात केली.लालबहादूरचे मास्तर मिश्राजी हे स्वतः मोठे देशभक्त होते.त्यांनीच लालबहादूरच्या अंगी देशप्रेम जागवले ते मुलांना स्वातंत्र्य संग्रामाच्या ; शहिदांच्या कुर्बानीच्या गोष्टी सांगत , त्यामुळे त्यांच्यामध्ये देशप्रेमाची भावना निर्माण झाली.मूर्ती लहान पण कीर्ती महान लाभलेल्या या नेत्याला देशवासीय कधीही विसरू शकणार नाही.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे पर्यवेक्षक दिघोरे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की,विद्यार्थांनी आपल्या अंगी शिस्त बाळगावी.शिस्तीला आपल्या जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे.शिस्त हीच माणसाची दिशा ठरवीत असते.
अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य मेश्राम यांनी सांगितले की,राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री यांनी सांगितलेल्या मार्गावरून चालल्यास आपण आपल्या जीवनात नक्कीच प्रगती साधू शकतो.त्यामुळे थोरांचे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.यावेळी काही विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक दाकोटे प्रास्ताविक अमर चौधरी तर आभार कु.मनस्वी राऊत हिने मानले.यावेळी सर्व प्राध्यापक, शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् या गीताने झाली.

