शारदा भुयार जिल्हा प्रतिनिधी, वाशिम – दि.२३ ऑक्टोबर (जिमाका): निवडणूक खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी आज जिल्ह्यातील नोडल अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत निवडणूक खर्च निरीक्षक गोपाल कृष्ण पती यांनी पारदर्शक आणि भयमुक्त निवडणुका पार पाडण्यासाठी विशेष सूचना दिल्या. त्यांनी प्रत्येक अधिकाऱ्याने आपली जबाबदारी समजून, निवडणूक प्रक्रिया अचूक व व्यवस्थित पार पाडावी असे सांगितले.
गोपाल कृष्ण पती यांनी निवडणुकीला लोकशाहीचा सण म्हणून संबोधित करत, प्रत्येकाने आपल्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. निवडणुकीच्या प्रचार रॅली आणि वाहतुकीच्या माध्यमातून होणाऱ्या रोटड व मद्य तस्करीवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच, संशयास्पद अर्थिक व्यवहारावर सूक्ष्म निरीक्षण करून त्याची नोंद व्हिडिओ व रजिस्टरद्वारे ठेवावी, असे त्यांनी सांगितले.
नागरिकांनी कोणत्याही राजकीय पक्षांच्या आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन करताना त्यांनी सर्व पथकांना दिलेल्या जबाबदाऱ्या वेळेवर व योग्यरित्या पार पाडल्या जातील याची खात्री अधिकाऱ्यांनी वेळोवेळी भेट देऊन करावी, अशी सूचना केली. तसेच संशयास्पद आर्थिक व्यवहार आढळल्यास, नागरिकांनी ‘7666 780 703 ‘ या क्रमांकावर त्वरित माहिती द्यावी, असे आवाहनही केले.
या बैठकीत जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस, मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, अप्पर जिल्हाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राम लंके, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण कोवे, जिल्हा कोषागार अधिकारी विजय जवंजाळ यांच्यासह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

