“वचननाम्यात मागण्यांच्या उल्लेखाची मागणी.”
शारदा भुयार जिल्हा प्रतिनिधी वाशिम – कारंजा (लाड) – राज्यात सुरु असलेल्या विधानसभा निवडणूकीमध्ये उमेदवारांकडून दिव्यांगांच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारच्या घोषणा करण्यात आल्या नाहीत.त्यामुळे दिव्यांग मतदारांच्या न्यायहक्काच्या विविध समस्या सोडविण्याकरीता बांधील राहणारे राजकिय पक्ष आणि उमेदवारालाच महाराष्ट्र अपंग संस्थेचा पाठींबा राहील. त्यासाठी उमेदवार व राजकिय पक्षांनी आपल्या विकास निधीमधून दरवर्षी १० टक्के रक्कम दिव्यांगाच्या समस्या सोडविण्यासाठी खर्च करण्याचा वचननामा लिहून द्यावा अशी मागणी दिव्यांग जनसेवक तथा संस्था अध्यक्ष संजय कडोळे यांनी केली आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात कडोळे यांनी नमूद केले आहे की,जिल्ह्यात गेल्या २५ वर्षापासून महाराष्ट्र अपंग संस्था कार्यरत असून सदर संस्थेचे वाशिम जिल्ह्यात हजारो दिव्यांग बांधव सभासद आहेत.कारंजा नगर पालिकेमधून दिव्यांगाना सहाय्यता निधी मिळालाच पाहीजे.या आग्रही मागणीच्या भूमिकेतूनच अगदी शून्यातून ह्या संस्थेची दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी स्थापना केली होती.संस्थेचे सदस्य कासम मुन्निवाले,कासम पटेल,हसन पटेल,इम्तियाजबी अजगरशहा, राजु आगरकर,ज्योती इंगोले, लक्ष्मण पाटील,बाळू पवार, सुपलकर ताई, नानाभाऊ देशमुख इत्यादी दिव्यांगाना संजय कडोळे यांच्या मार्गदर्शनाने विविध योजनांचा लाभ देखील मिळालेला आहे. परंतु ज्याप्रमाणे आज रोजी नगर पालिकेच्या विकास निधीमधून दिव्यांगासाठी दरवर्षी ५% निधी राखीव ठेवण्यात आला. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील २८८ आमदाराच्या विकासनिधी मधून दरवर्षी किमान १० % निधी आपआपल्या मतदार संघातील दिव्यांगासाठी राखीव ठेवण्यात येवून दिव्यांगाच्या आवश्यक गरजांची पूर्तता करण्याकरीता त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावा ही महाराष्ट्र अपंग संस्थेची मागणी आहे.मात्र ही मागणी अद्याप पुर्ण करण्यात आली नाही.त्यामुळे विधानसभा निवडणूकीत उभे असलेल्या उमेदवारांनी दिव्यांगाच्या समस्याची जाणीव ठेवून आपल्या निवडणूक वचननाम्यात दिव्यांगाकरीता दरवर्षी आपल्या विकास निधीमधून किमान १० टक्के निधी राखीव ठेवावा. यासह निराधार दिव्यांगाना स्व.संजय गांधी अपंग अनुदान योजनेतुन दहा हजार अनुदान, दिव्यांगाच्या पुनर्वसनाकरीता भुखंडासह मोफत घरकुल योजना,घरकुल योजनेत फुटपाथवरील दिव्यांग, बेघर,निराश्रीत,निराधार दिव्यांगाना प्राधान्य,दिव्यांगाच्या विवाहासाठी अर्थसहाय्यात वाढ व मोफत संसारोपयोगी साहित्य, दिव्यांगाच्या मुलामुलींना मोफत शिक्षण,प्रत्येक गावात दिव्यांगासाठी आधारकेन्द्र, महाराष्ट्र राज्य अपंग वित्त विकास महामंडळाच्या कर्ज वितरणाच्या जाचक अटी रद्द करून व्यवसायासाठी विनाजामीन कर्जाची उपलब्धता आदी मागण्यांच्या पुर्ततेबाबत उमेदवारांनी आपल्या वचननाम्यात उल्लेख करावा. दिव्यांगाच्या समस्या सोडविण्यास बांधील राहणार्या राजकिय पक्ष किंवा उमेदवारालाच पाठींबा राहील असे महाराष्ट्र अपंग संस्थेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी म्हटले आहे.

