सिद्धार्थ स्पोर्ट क्लबचा स्तुत्य उपक्रम.
कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर – नागभीड़ तालुक्यातील गिरगांव येथे सिद्धार्थ स्पोर्ट क्लब द्वारा दिवाळीच्या सुट्टीमध्ये गावस्तरिय भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. बदलत्या आधुनिक जगामध्ये छोट्या मुलांपासून तरुणांपर्यंत आणि ज्येष्ठ मंडळी मोबाईलच्या जाळ्यात अडकून आयुष्य जगत आहेत. डिजिटल युगामध्ये मैदानी खेळांचा विसर पडल्याने गावातील मैदान ओसाळ पडलेले दिसत असतात. मरगळलेल्या मनाला नवी चेतना मिळावी आणि गावातून बाहेर गेलेली सर्व तरुण मंडळी जेव्हा दिवाळीला गावी येतात तेव्हा त्यांनी या स्पर्धेत सहभागी होऊन बालपणी खेळलेल्या या खेळांचा आस्वाद घ्यावा. याकरिता सिद्धार्थ स्पोर्ट क्लब तर्फे दरवर्षी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेचे उद्घाटन दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी गुरुवारला विनोद पा. बोरकर, अध्यक्ष श्रीलक्ष्मी पतसंस्था गिरगांव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्घाटनप्रसंगी गिरगांव ग्रा. पं. च्या प्रथम नागरिक गीताताई बोरकर, प्रफुल खापर्डे, माजी पंचायत समिती सदस्य, नितीन जैस्वाल, सदस्य ग्रा. पं. गिरगांव, जगदीश पा. बोरकर,सदस्य ग्रा. पं. गिरगांव, पुरुषोत्तम चावरे, आणि इतर प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती. या क्रिकेट स्पर्धेमध्ये गिरगांव येथील जवळपास ८ संघांनी सहभाग घेतला. त्यापैकी अंतिम सामना 3G क्रिकेट टीम आणि अशोका क्रिकेट टीम या दोन संघामध्ये रंगला होता. त्यापैकी ७ गडी राखून 3G क्रिकेट टीमने अशोका क्रिकेट टीमवर विजय मिळवित 10,001/- रुपयाचे प्रथम पारितोषिक जिंकले. तर अशोका क्रिकेट टीमला द्वितीय पारितोषिक 7,001/- रुपयाचे पारितोषिक मिळाले. संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाळूचे बक्षीस मोहित चन्ने यांनी पटकाविले. उत्कृष्ट फलंदाज हिमांशू खोब्रागडे तर उत्कृष्ट गोलंदाज संदक्ष सतीश खोब्रागडे यांना पारितोषिक मिळाले. बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला श्री. काशिनाथ खोब्रागडे, माजी सरपंच ग्रा. पं. गिरगांव, प्रशांत गायकवाड, माजी सरपंच ग्रा. पं. गिरगांव, प्रभाकर खोब्रागडे, माजी सदस्य ग्रा. पं. गिरगांव, अरविंद गिरडकर, व आदी मंडळी उपस्थित होती. या स्पर्धेमध्ये पंच म्हणून श्री. रवींद्र रा. खोब्रागडे, निकेश खोब्रागडे, अमन मेश्राम, राकेश खोब्रागडे, यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. स्पर्धेचे अचूक धावसंख्या फलक लिहिण्याचे काम साहिल खोब्रागडे यांनी तर निवेदनाची भूमिका कुंदन खोब्रागडे संस्थापक अध्यक्ष क्रिया फाउंडेशन गिरगांव यांनी सांभाळली. या स्पर्धेला यशस्वी करण्याकरिता सिद्धार्थ स्पोर्ट क्लबच्या सर्व सदस्यांनी आणि मार्गदर्शक मंडळींनी परिश्रम घेतले.

