आरमोरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – कर्मवीर विद्यालय तथा कला कनिष्ठ महाविद्यालय,वासाळा (ठाणेगाव) तालुका आरमोरी गडचिरोली येथे दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोजी भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील मेश्राम आणि प्रमुख अतिथी यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील मेश्राम,प्रमुख अतिथी पर्यवेक्षक प्रमोद दिघोरे ,ज्येष्ठ शिक्षक सदानंद कुथे,भास्कर उरकुडे तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा.नानाजी रामटेके होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद दिघोरे पर्यवेक्षक यांनी केले.आपल्या प्रास्ताविकात त्यांनी सांगितले की ,संविधान हा आपल्या देशाचा प्राण असून सर्व विद्यार्थांनी संविधानाचे वाचन करून त्यातील मूलभूत तत्वे ,कर्तव्य आणि अधिकार समजून घेणे गरजेचे आहे.
प्रमुख वक्ते प्रा.नानाजी रामटेके यांनी आपल्या भाषणातून संविधान म्हणजे नेमके काय? याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती सांगितली.प्रत्येक व्यक्तीला सर्वांगीण विकास साधण्याची समान संधी उपलब्ध करून देणारा मुख्य दस्तऐवज म्हणजे आपले संविधान.संविधानानुसार राज्यकारभार करण्याचे तत्व जगातील बहुतेक सर्व देशांनी स्वीकारलेले आहे.असे असले तरी जगातील प्रत्येक देशाच्या संविधानाचे स्वरूप हे त्या देशाचा इतिहास, समाजरचना, संस्कृती आणि परंपरा व उद्दिष्टानुसार वेगवेगळे असते.
स्वातंत्र्य, समता,बंधुता व न्याय या मूल्यांवर आधारित भारतीय संविधान कार्यरत आहे नवसमाज व नवनिर्मिती करण्यासाठी मी प्रथमतःभारतीय आणि शेवटीही भारतीयच आहे ,असा महान संदेश या देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे.डॉ.बाबासाहेबांनी या दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे भारतीय संविधान होय.भारतीय संविधानाने नागरिकांना जे मूलभूत हक्क दिलेले आहेत,या हक्कांमुळेच प्रत्येक व्यक्ती माणूस म्हणून समाजात सन्मानाने जगू शकतो.शासनसंस्थांवर आपले नियंत्रण ठेवू शकतो.
संविधानाचे महत्व लोकांना कळावे यासाठी त्यांना जागृत करणे आवश्यक आहे. जगात आदर्श संविधान म्हणून भारताच्या संविधानाचा गौरव केला जातो.याचे कारण म्हणजे भारताचे संविधान हे स्वातंत्र्य , समता बंधुता व न्याय या चार मूल्यांवर आधारलेले आहे.भारतीय संविधान हा राष्ट्राचा प्राण आहे असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य सुनील मेश्राम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले की ,आज भारतीय संविधानाला ५० वर्ष पूर्ण होत असल्याने शासनाच्या निर्णयाप्रमाणे राज्यात वर्षभर विविध कार्यक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन जांभूळे यांनी तर आभार कुमारी समृद्धी मेश्राम यांनी मानले.

