ठाणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दि.04 ठाणे जिल्हा परिषद क्षेत्रात, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत रविवार ०८ डिसेंबर, २०२४ रोजी ग्रामीण भागातील अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, मुरबाड तालुक्यात तसेच बदलापूर व अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात येणार आहे. सर्व बालकांना विहित वयात प्राथमिक लसीकरण, नियमित एएफपी सर्व्हेक्षण आणि पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेतंर्गत ० ते ५ वर्षाखालील सर्व बालके संरक्षित करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. राज्यात सन १९९५ पासून दरवर्षी पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात येते.
ठाणे जिल्हा परिषदच्या सार्वजनिक आरोग्य विभागातंर्गत कार्यरत सर्व आरोग्य केंद्रामध्ये ही लस मोफत उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचा लाभ पालकांनी ० ते ५ वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना द्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले आहे.
ग्रामीण भागातील ० ते ५ वर्षाखालील १ लाख ८ हजार ७२४ बालकांना तर बदलापूर व अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रातील ६८ हजार ८३३ बालकांना असे एकूण १ लाख ७७ हजार ५५७ बालकांना पल्स पोलिओ लस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
ठाणे जिल्हा परिषद क्षेत्रात, एकूण १ हजार ४०३ बूथवर ही लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी ठाणे जिल्हा परिषद ३ हजार ४४० कर्मचारी कार्यरत असतील. गेल्यावेळी झालेल्या मोहिमेत ठाणे जिल्हा परिषद क्षेत्रात, ० ते ०५ या वयोगटातील ०१ लाख ४० हजार ०९२ बालकांना लस देण्यात आली होती.

