राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड
मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – संख्याबळ कमी असेल तरी प्रगल्भ लोकशाहीसाठी विरोधक आवश्यक असतो त्यामुळे विरोधकांना भूमिका मांडायला संधी दिली पाहिजे, अशी अपेक्षा माजी विरोधी पक्षनेते,ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी आज व्यक्त केली.
विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आज विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी माजी विरोधी पक्षनेते ,ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी अध्यक्षांचे अभिनंदन केले.
अभिनंदन करताना विजय वडेट्टीवार म्हणाले , याआधी अडीच वर्ष अध्यक्ष म्हणून काम करताना तुम्ही सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील आमदारांना न्याय दिला. सभागृहात विरोधक हे जनतेचे प्रश्न मांडत असतात, मतदारसंघातील जनता देखील आपला लोकप्रतिनिधी काय प्रश्न मांडतात याकडे लक्ष ठेवून असतात, त्यामुळे यावेळी दोन्ही बाजूला आपण न्याय द्याल अशी अपेक्षा विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.
अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांनी अडीच वर्ष काम करताना कधी कुणाला दुखावले नाही, बोलताना शब्द बोचणारे नव्हते, संयमाने काम करणारे अध्यक्ष म्हणून तुमची प्रतिमा आहे असे कौतुक केले.
यावेळी महायुती सरकारला बहुमत आहे विरोधकांची संख्या कमी आहे. संख्याबळ कमी असेल तरी प्रगल्भ लोकशाहीसाठी विरोधक आवश्यक असतो त्यामुळे विरोधकांना भूमिका मांडायला संधी दिली पाहिजे, अशी अपेक्षा वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. या सभागृहातील २८८ लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेचे अपेक्षांचा भार तुमच्यावर आहे, त्यामुळे दोन्ही बाजूच्या सदस्यांना आपण न्याय द्याल ही अपेक्षा विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

