प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
जयेंद्र चव्हाण/जिल्हा प्रतिनिधी भंडारा – तालुका कृषी अधिकारी कार्यालय पवनी येथे दिनांक २०/१२/२०२४ ला प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची (PMFME) एक दिवसीय तालुका स्तरीय कार्यशाळा कार्यालयाच्या सभागृहात तालुका कृषी अधिकारी आदित्य घोगरे यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली.
कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा संसाधन व्यक्ती अमित ठवकर,स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक सुशांत विरुटकर, कृषी अधिकारी कार्तिक नखाते आदी उपस्थित होते.
सदर कार्यशाळेत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.त्यासाठी लागणारे कागदपत्रे,पात्रता इत्यादीची माहिती जिल्हा संसाधन व्यक्ती अमित ठवकर यांनी दिली.स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक श्री.विरूटकर यांनी बँकेच्या योजनाबद्दल कार्यपद्धती तसेच इतर कृषी संलग्न योजना करिता बँकेच्या योजनांची माहिती दिली. एच.डी.एफ.सी. बँकेचे प्रतिनिधी यांनी बँकेच्या शेतीउपयोगी योजना तसेच शेतकऱ्यांना बँकेसंबंधी अडीअडचणीचे निराकरण केले.
कृषी पर्यवेक्षक कु.भारती येरणे यांनी कृषी विभागाच्या विविध योजना शेतकऱ्यांना समजावून सांगितल्या व योजनांची ओळख करून दिली. सदर कार्यशाळेत पी.एफ.एम.ई. योजनेमध्ये यशस्वी वाटचाल केलेल्या उद्योजकांचे मनोगत घेण्यात आले. तसेच व्हिडीओद्वारा यशोगाथा दाखविण्यात आल्या.
कृषी मार्गदर्शन कार्यशाळेचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी आदित्य घोगरे यांनी केले.संचालन कृषीसेवक कु.किर्ती भार्गव यांनी केले.तर आभार कृषि पर्यवेक्षक भूमेश नवखरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता मंडळ कृषि अधिकारी दिनेश काटेखाये तसेच सर्व कृषि सहाय्यक व कृषि सेवक यांनी सहकार्य केले.

