डॉ. लिलाधर पाटील लिखित ‘संस्कार’ पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

0
61

पिंपरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क -=पिंपरी (दिनांक : २६ डिसेंबर २०२४) “माणसाचे वागणे कुटुंब घडवते, समाज घडवते आणि राष्ट्रदेखील घडवते. या जडणघडणीलाच संस्कार म्हणतात!” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक विनोद इंगळे यांनी व्यक्त केले. लेवा पाटीदार मित्रमंडळ, सांगवी यांच्या वतीने डॉ. लीलाधर पाटील लिखित ‘संस्कार’ पुस्तकाचे प्रकाशन जुनी सांगवी येथील डॉल्फिन कार्यालयात बुधवार, दिनांक २५ डिसेंबर २०२४ रोजी संपन्न झाले. यानिमित्ताने आयोजित
स्नेहमेळाव्यात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना विनोद इंगळे बोलत होते.
याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय जगताप, माजी महापौर माई ढोरे, माजी नगरसेवक नामदेव ढाके, शारदा सोनवणे, हर्षल ढोरे, संतोष कांबळे, एल सी सी आय ए (पी सी एम सी चाप्टरचे) अध्यक्ष भूषण गाजरे, समता भातृ मंडळाचे अध्यक्ष हेमंत झोपे, डॉ. लीलाधर पाटील, डॉ. नीळकंठ पाटील, भागवत झोपे, सुरेश भोळे हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी तन्वी पाटील, लीना बोरोले, भूषण फेगडे, रोहन फेगडे, पीयूष फेगडे या उद्योजकांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

विनोद इंगळे पुढे म्हणाले की, “आई वडील आपल्या आयुष्याच्या गाडीचे दोन चाके असतात. त्यातल्या एकाला खूप किंमत आहे आणि दुसऱ्याला नाही, असे नसते. आई संस्कार देते, तर वडील कर्तव्याची जाणीव देतात. आई प्रेमाची ऊब असते, तर बाबा जगण्यासाठी लागणारा कणखरपणा असतो. माता पित्याची किंमत ज्यांना छत्र मिळत नाही त्यांना लवकर कळते. आई-बाबा आपल्या आयुष्याला पुरणारे नसतात; पण आहे तोवर त्यांचा सन्मान आणि त्यांनी केलेल्या आपल्या सुखासाठीच्या त्यागाची किंमत आपण ठेवावी!”
प्रमुख पाहुणे आणि पाटीदारांवर संशोधन केलेले ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नीळकंठ पाटील म्हणाले, “भारतीय शास्त्राप्रमाणे प्रत्येक कृतीच संस्कारातून संस्कारयुक्त असली पाहिजे. प्रत्येक कार्य चांगले संस्कारयुक्त असले पाहिजे. उदाहरणार्थ केळी खाऊन आपण सालपट बाहेर फेकतो ही कृती आहे. केळी खाऊन साल कचऱ्याच्या टोपलीत टाकतो ती प्रकृती (मूळ स्वभाव) आहे. साल रस्त्यावर टाकणे ही विकृती आहे. दुसऱ्याने रस्त्यावर टाकलेली साल कचऱ्याच्या डब्यात टाकतो ही संस्कृती आहे!”

मंडळाचे अध्यक्ष भागवत झोपे यांनी प्रास्ताविक केले. पंकज पाटील आणि ऊर्मिला पाटील यांनी बहारदार सूत्रसंचालन केले. महेश बोरोले यांनी आभार मानले. ख्याती अत्तरदे आणि तनया अत्तरदे यांनी गणेश वंदना सादर केली. देवेंद्र पाटील, संजय भंगाळे, विलास पाटील, रवींद्र पाटील, प्रेमचंद पाटील, नथुराम भोळे, भूषण गाजरे यांनी संयोजन केले.

महिलांसाठी ‘खेळ रंगला पैठणीचा’ म्हणजेच ‘कौन बनेगा बक्षीस पती?’ हा खेळ घेण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सुग्रास खानदेशी भोजनाचा सुमारे ६०० बांधवांनी लाभ घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here