आवास योजनेतील प्रत्येक घरे सोलर पॉवर करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
28

मुंबई प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दि. ३० : प्रधानमंत्री आवास योजनेंअंतर्गत किमान 13 लाख घरकुलांना मंजुरी देण्यात येणार आहे. याकरिता लवकरच घरकुल लाभार्थ्यांना पहिला रू.४५० कोटी रूपयांचा हप्ता वितरित करण्यात यावा. ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या प्रभावी, गतीमान, दर्जेदार अंमलबजावणी व लोकसहभागासाठी महाआवास अभियान राबविण्यात यावे. त्याचप्रमाणे या आवास योजनेतील प्रत्येक घर हे सौर ऊर्जेवर करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केल्या.
राज्यातील ग्रामीण रस्ते तयार करतांना ते सिमेंटचेच करावे, अशा सूचना करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ग्रामीण रस्ते कधीही थांबवू नये. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तसेच पाणंद रस्ते यातील निकष नव्याने ठरविण्याबाबत त्यांनी सूचना केली. कोकणातील साकव तसेच पाणंद रस्त्यांची कामे तात्काळ हाती घेण्यात यावी. गावखेड्यातील प्रत्येक तांड्याकरिता रक्कम देण्यात आली असून यातील किती कामे झाली यावर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
ग्रामीण गृहनिर्माण, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, रस्ते व पूल दुरुस्ती परीक्षण कार्यक्रम, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रा स्थळ योजना त्याचबरोबर ग्रामविकासाच्या विविध योजना शंभर दिवसांमध्ये प्रभावीपणे राबवा असे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला. या बैठकीस अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलार, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव संजय सेठी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, प्रधान सचिव एकनाथ डवले, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, सचिव विरेंद्र सिंह, सचिव रविंद्र सिंह, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here