प्रणित तोडे चंद्रपूर प्रतिनिधी – इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमॅट चेंज चे औचित्य साधून श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई आणि चंद्रपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित भव्य पर्यावरण यात्रेत शहरातील विविध शाळांनी विषयाशी संबंधित देखाव्यांचे सादरीकरण केले. या यात्रेत स्थानिक लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या देखाव्याला प्रथम पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
विद्यालयाने सुंदरलाल बहुगुणा यांच्या चिपको आंदोलनाचा देखावा सादर केला. सदर देखावा विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन टाकाऊतून टिकाऊ या संकल्पनेतून तयार करण्यात आला होता. तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञापत्राचा मोठा फलकही उभारण्यात आला होता. या रयतेच्या राजाने आपली दूरदृष्टी दाखवत वृक्षसंवर्धनाचा संदेश सुमारे पाचशे वर्षांपूर्वी दिला होता त्याचे स्मरण यात्रेच्या निमित्ताने पुन्हा एकदा करून देण्यात विद्यालयाला यश आले.
तसेच या चर्चासत्राचे गांभीर्य विद्यार्थ्यांना कळावे म्हणून आयोजित निबंध स्पर्धेत लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालयाच्या इयत्ता ११ वी कलाशाखेची विद्यार्थिनी कु. तन्वी अतुल ठाकरे हिने द्वितीय क्रमांक पटकावला. तिला प्रमाणपत्र व रोख तीन हजार रुपयांचे पारितोषिक प्राप्त झाले.
दिनांक १८ जानेवारी शनिवारी पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात आमदार सुधीर मुनगंटीवार आणि एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांच्याहस्ते पारितोषिक वितरण झाले.
या यशासाठी लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे अध्यक्ष अँड. रवींद्र भागवत, सचिव गांगेय सराफ तसेच समस्त व्यवस्थापक मंडळ मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

