उषा पानसरे मुख्य कार्यकारी संपादक – गडचिरोली: मानवी जीवन हे वैशिष्ट्यपूर्ण असून जीवनाचा आनंद घेण्याकरिता प्रत्येकाने एक तरी कला आत्मसात केली पाहिजे. कला ही मानवी समाज व संस्कृतीची सर्जनशील अभिव्यक्ती असते. मनाच्या प्रफुल्लते बरोबरच अंत:करण फुलवण्याची क्षमता कलेमध्ये असते. कल्पना आणि मूल्य जागृत करण्याची शक्ती आणि दृष्टिकोन बदलण्याचे सामर्थ्यही कलेमध्ये असल्यामुळे कला जीवनाला अर्थ देत जीवन सुगंधित करते. म्हणून प्रत्येकाने एकूण ६४ कलांपैकी एक तरी कला आत्मसात करावी. धकाधकीच्या जीवनात नैराश्याला बाजुला सारत कलेतून आनंद मिळवावा, असे प्रतिपादन नाट्यकलावंत प्रा. राजकुमार मुसणे यांनी केले. ते गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी व विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकरिता आयोजित अमृत कला व क्रीडा महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली मा. डॉ. श्रीराम कावळे होते. प्रमुख अतिथी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्राप्त डॉ.शरद सूर्यवंशी होते. तसेच आयोजक प्रा.डॉ.अनिता लोखंडे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मनोज जाधव, प्रवीण पहानपट्टे, श्री.झाडे उपस्थित होते. अध्यक्ष स्तरावरून बोलताना गुन्हा विद्यापीठाचे प्र कुलगुरु मा.डॉ. श्रीराम कावळे यांनी कर्मचाऱ्यांमध्ये असलेल्या कला व क्रीडा गुणांचे कौतुक करीत प्रोत्साहित केले. विद्यापीठामार्फत दैनंदिन फाईल मध्येच अडकलेल्या कर्मचाऱ्यांना विरंगुळा म्हणून व त्यांच्या कलागुणांना चालना देण्यासाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे निकाल जाहीर करीत मान्यवरांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण याप्रसंगी करण्यात आले. सर्व विजेत्यांचे मान्यवरांनी कौतुकाभिनंदन केले.

