प्रा. राजकुमार मुसणे
प्रशांत रामटेके मुख्य संपादक प्रबोधिनी न्युज – धनंजय स्मृती रंगभूमी वडसा प्रस्तुत, नितीन नाकाडे निर्मित, घनश्याम उपरीकर दिग्दर्शित, युवराज गोंगले लिखित’ बाळा..! मीच तुझी आई रे’ या नाटकाचे आयोजन संमिश्र नाट्य कला मंडळ माहूरकुडा, जि. गोंदिया येथे १८जानेवारीला केले. रसिकप्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादात नाट्य प्रयोग यशस्वीरित्या संपन्न झाला. गरिबांच्या व्यथा अनेक नाटकातून दर्शविलेल्या आहेत परंतु हे नाटक मात्र श्रीमंत कुटुंबीयांच्या व्यथा, वेदना दर्शविणारे असून सावत्र असली तरी मात्र तीही माता आहे, तिच्यातील मातृत्व, जिव्हाळा, आपलेपणा याची महती’ बाळा..! मीच तुझी आई रे ‘या नाटकातून दर्शविलेली आहे. अर्थातच सावत्र आईची महती दर्शविणारे नाटक आहे.
नात्यातील स्वार्थीपणा टोकाला पोहोचत आहे.किंबहुना जवळचे नाते म्हणून पाहणारे रक्ताचे मामा असूनही त्यांच्यातील स्वार्थ, दुष्टता, कावेबाजपणा नाटककाराने प्रामुख्याने अधोरेखित केली आहे. एकंदरीत विविध मनोवृत्तीच्या नात्यातील अपप्रवृत्तीचे दर्शन घडविणारे हे कौटुंबिक नाट्य आहे.
नाटकाच्या प्रारंभी रेकॉर्डिंगच्या निवेदनातून सर्व पात्रांचे स्वभाव विशेष आणि कर्तुत्व उलगडले जाते. शिवा इंडस्ट्रीचा मालक वैष्णव कदम यांनी परिश्रमाने आणि बुद्धीचातुर्याने प्रचंड संपत्ती मिळवलेली परंतु त्याचा साला भुजंग हा मात्र स्वार्थापोटी स्वतःच्या भाच्याला अर्थात शिवाला लहानपणापासून दुधामध्ये विष मिसळून देऊन विकलांग, मतिमंद बनवितो. बहिणीच्या मृत्यूनंतर दिव्यांग भाचा असल्यामुळे सर्व संपत्ती आपल्याच मालकीची होईल, यासाठी भुजंग राणे, सुजाता राणे त्यांचा धूर्त मुलगा मंदार राणे या त्रिकुटांनी कट रचून शिवाला कायमचं दुर्बलच ठेवण्यासाठी प्रयत्नरत असतात. शिवाचा छळ , हाल अपेष्टा करतात. खायला बिस्किट न देता शिवाला लाथडतात, कुत्रा बनवतात, जिवंतपणी मरणयात्रा भोगाव्या लागतात.
वैष्णव कदम व्यवसायानिष्ठ बनत देशोदेशी फिरून संपत्ती जमवतो; तर त्याचे नातेवाईक भुजंग, मंदार हे मात्र त्याच्याच पैशावर ऐश अन् उधळपट्टी करतात. वैष्णव कदम यांच्याकडील नोकर मन्या मात्र प्रामाणिक आहे. त्याला शिवावरील अत्याचार पाहावत नाही. तो मध्यस्थी करीत सुहासिनीला वैष्णव कदम यांच्याशी दुसरा विवाह करण्याकरिता प्रवृत्त करतो. गाडगेबाबांच्या विचारानुसार वृद्धाश्रमात सेवा करणारी सुहासिनी वैष्णवच्या बाळाचा आधार हवा या याचनेने होकार देते. राणे त्रिकूटास मात्र वैष्णवने सुवासिनीसी दुसरे लग्न करणे अजिबात आवडत नाही. वैष्णवला बेदखल करण्याचे कारस्थान जाणीवपूर्वक घडवीत असतात. त्यात वकील घोडेस्वारही लालचीपणामुळे सहभागी होतो. वकील एका एकाला कसं संपवायचं, याविषयीचा सल्ला देतो. बोनसच्या माध्यमाने कागदपत्रावर सह्या घेऊन वैष्णव कदम यांना संपत्तीतून बेदखल करण्याकरिता युक्ती आखतो.
सुहासिनी मतिमंद मुलांचा धिक्कार करते. तेंव्हा मन्या तिला चपराक मारत सजग करतो.
सुहासिनीच्या प्रयत्नामुळे व तज्ञ डॉक्टरांच्या योग्य उपचारामुळे मतिमंद शिवा काही प्रमाणात दुरुस्त होतो. नऊ वर्षापर्यंत माहिती असलेली सगळी नाती तो ओळखायला लागतो. कालांतराने शिवाची मैत्री सोबतचे दृढ होत गेलेले संबंध व प्रेम यामुळे शिवा दिवसेंदिवस सुधारायला लागतो. कट-कारस्थान करणाऱ्या दुष्ट आई -वडिलांना मैत्री चांगलाच धडा शिकवते . नीच, नालायक म्हणून निर्भत्सनेने त्यांच्यावर थुंकते ,त्यांना चोर म्हणते. किंबहुना शिवाची दुरावलेली आई व संपत्ती मिळवून देण्यासाठी मैत्री ऑटोकाट प्रयत्न करते. सुवासिनी रक्त, किडनी विकून शिवाला माणसात आणते. मन्या हात जोडून शिवाला सर्व हकीकत सांगत सावध करतो.सर्वस्व अर्पण करणारी जगातील एकमेव सावत्र आई म्हणजे तुझी आई सुहासिनी आहे. हे पटवून देतो.मंदार, भुजंग आणि वकील यांचे कटकारस्थान सुरूच असते. वासनांध भुजंग सुवासिनीवर अत्याचार करतो. मन्याचे सुहासिनीशी संबंध असल्याविषयी व ती सर्व प्रॉपर्टी स्वतःच्या नावे करण्याकरिता प्रयत्न करत असल्याचे सांगत शिवाला भडकवतात. शिवा मात्र वकिलाला चांगलाच खडसावतो. ते सुवासिनीला छेडतात ,लचके तोडायला धावतात , अत्याचार करतात.परंतु या सर्वातूनही सही -सलामत बाहेर पडत सुवासिनीचे शिवावरील प्रेम वृद्धिगत होत जाते. शिवा आईच्या प्रेमासाठी तळमळतो. मला ही संपत्ती नको ,तू हवे ,तुझे प्रेम हवे असे म्हणत, माणूसकी विसरलो नाही, जनावर झालो नाही, असं म्हणत सुवासिनी शिवाचा मनापासून स्वीकार करते अन् बाळा…! मीच तुझी आई रे ‘अशी आर्त टाहो फोडते. राणे कुटुंबीयांच्या कट कारस्थानाला पारो मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग करून उजागर करते. मैत्री पोलिसाकडे तक्रार करताच इन्स्पेक्टर जगदीश मंदार राणे, सुजाता राणे, भुजंग राणे आणि एडवोकेट घोडेस्वार यांना अटक करतात .
परिश्रमाने अमाप संपत्ती कमविणारा शिवा इंडस्ट्रीचा मालक वैष्णव कदम (सोहन शुक्ला) ,शिवा इंडस्ट्रीचा मॅनेजिंग डायरेक्टर स्वार्थी मंदार राणे (शुभम हुड), धुर्त, कावेबाज सुजाता राणे (विद्या खुणे), दुष्ट प्रवृत्तीचा कटकारस्थानी भुजंग राणे (आनंद नाकाडे), प्रामाणिक घरगडी मन्या (किरपाल सयाम), शिवा इंडस्ट्रीचा एकुलता एक मतिमंद वारस शिवा कदम (घनश्याम उपरीकर), अनाहूत सल्ले देऊन फसवणुकीस प्रवृत्त करणारा ऍडव्होकेट घोडेस्वार (रतन सोमवारे), दारूडा काका विनोदवीर (दुधराम कावळे), सावत्र आईही सुद्धा किती प्रेमळ असू शकते अशी सर्वस्व अर्पिणारी वात्सल्यमूर्ती सुहासिनी (करिष्मा), शिवाला साथ देणारी सहृदयाची मैत्री (मयुरी), पारो (नैना), इनिस्पेक्टर जगदीश (सोहन शुक्ला) या पात्रांच्या संवादातून नाट्य उलगडते.
नाटकातील विनोदही वैशिष्ट्यपूर्ण आहे. झाडीपट्टीतील लोकप्रिय दूधराम कावळे, किरपाल सयाम या जोडीला नयनाची साथ मिळाल्यामुळे नाटकातील विनोद प्रेक्षकाला खुर्चीला खेळवून ठेवतो. स्वभावनिष्ठ व प्रसंगनिष्ठ विनोदाने पेक्षागृह हसायला लागते. तुरी मुराले, भेद्रे हलवून,किडे, टीव्ही चित्रहार, रिकामी जागर, कणसवून,नेत्रदान, आग्याबेताल अशा वैशिष्ट्यपूर्ण शब्दोच्चाराने तथा ‘पितेस हरकुंडी उलार होते तुझी बंडी,’ मनुलाल मनकवडे दुधीचे वडे,’ येलतोडे, झेंडा फडकवणे, कन्या, खुदवड, आपण प्यावे दुसऱ्याला पाजावे बेवडे करून सोडावे सकळजन ‘ज्याचे घर भट्टीपाशी त्याला२४ तास भेटे देशी’ अशा संवादतून हास्याची फवारे उडतात.
नाटकातील गीतेही नाट्याशय व्यक्त करणारी परिणामकारक आहेत. ‘माझी माय, माझी माय,दुधावरची गा साय’ जरी जन्म दिला मी नाही, का रे तुझ्याकडे मन जाई बाळा मी तुझीच आहे’
‘डोळ्यातून आसवांच्या धारा कशा बरसती, होती वज्राचे घाव उरावर, विसरली नातीगोती’ ‘व्याकूळ कसे मन होई रे ‘ डोळ्यातून आसवाची.. बाळा मीच तुझी आई रे’, नाटकातील आर्तता सुचित करणाऱ्या गीतकार युवराज गोंगले यांच्या भावगर्भी गीतांमुळे नाट्याशय परिणामकारकपणे व्यक्त होतांना प्रेक्षक गदगदतो. डोळे पाणावतात. तसेच ‘पारू तू माझ्या संगतीन रमशील का,’ ‘मी तुझा राघू तू माझी मैना’ अशा विनोदी गीताने व ‘गोऱ्या गोऱ्या अंगात लाल लाल चोळी’ या लावणीने नाटकात चांगली रंगत आणली.
प्रयोग सहाय्यक सुभाष मेश्राम, राज पेंदोरकर, केवळ बगमारे, भागवत त्रिकारवार यांची संगीत साथ ,ठाकरे यांची ध्वनीव्यवस्था आणि रजत आर्टचे नेपथ्य यांच्या उत्कृष्ट समन्वयातून नाटकात रंगत आणली. नाटकातील संवाद ही विलक्षण आहेत. जय गोविंदा जय गोपाला तू खा काला आमच्या घशात सर्व माल मसाला ‘हे पालूपाद वारंवार उच्चारल्यामुळे मजा येते.
शिवाचा आकांत, भुजंगचा स्वार्थ, अतिरेक व भणंगपणा, वकिलाची घोड्यासारखी वैशिष्ट्यपूर्ण लकब, सुवासिनीचे बाळाच्या सुधारणेसाठीचे प्रयत्न व आक्रंदन , मन्याचा प्रामाणिक दिलदारपणा अनुभवण्यासाठी हे नाटक पाहायला हवे. उत्तम दिग्दर्शन , आशयसूचक गीते सर्व कलावंतांचा कसदार अभिनयाबरोबरच घनश्याम उपरीकर व करिष्मा यांच्या जिवंत अभिनयाने नाट्य प्रयोग सरस ठरला.
समाजामध्ये सावत्र आईची प्रतिमा ही छळ करणारी, मारहाण करणारी, त्रास देणारी अभयारण्या करणारी अशी बदनाम प्रतिमा निर्माण करण्यात आलेली आहे. या नाटकातून मात्र नाटककाराने मुलंही देवाघरची फुले असतात, त्यांना आत्मियतेने जवळ घ्या, माया करा, प्रेम करा, त्यांचा आधार व्हा, असा संदेश देत सावत्र आई ही सुद्धा त्यागी,अतीव माया करणारी, जीव लावणारी आई असते, तिच्यातील मातृत्व हे उदात्त असल्याचे ‘बाळा..! मीच तुझी आई रे’ नाटकांतून नाटककार युवराज गोंगले यांनी सूचित केले आहे.
प्रा. राजकुमार मुसणे, गडचिरोली

