प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आपल्या वाट्याला आलेली भूमिका कोणतीही असो शंभर टक्के त्या भूमिकेशी समरस होऊन ती भूमिका जिवंत साकारण्यासाठी प्रयत्नरत झाडीपट्टीतील स्त्री नाट्यकलावंत म्हणजेच पायल होय. झाडीपट्टीतील अव्वल दर्जाचे व्यावसायिक नाट्य मंडळ चंद्रकमल थिएटर्स मध्ये मागील सतरा वर्षापासून ती विनोदी भूमिका प्रामुख्याने साकारते आहे. सदाबहार अष्टपैलू कलावंत डॉ.शेखर डोंगरे व कॉमेडी किंग के .आत्माराम सर यांच्यासोबतची पायलची विनोदी प्रवेशातील जुगलबंदी झाडीपट्टीतील रसिकांना आकर्षित करणारी आहे. त्यामुळे त्यांचे अनेक फॅन झाडीपट्टीत गावागावात आढळतात. मल्टीमीडियाच्या युट्युब सारख्या चैनलवर सर्वाधिक पसंती या तिघांनाच दिसते. ज्येष्ठ नाट्य कलावंताच्या तोडीस तोड देत त्यांच्या ॲक्शनला प्रतिसाद देत सुमधुर गायन, दिलखेचक अदाकारी,नृत्य आणि परफेक्ट टाइमिंग, प्रभावी संवादफेक,कसदार बिनधास्त अभिनयाने प्रेक्षकांना जिंकणारी सदाप्रसन्न नाट्य कलावंत म्हणजेच पायल उर्फ विशाखा तुलसी कडूकर होय.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्या अंतर्गत परसोडी या लहानशा आडवळणाच्या खेड्यात गरीब शेतकरी कुटुंबात पायल उर्फ विशाखाचा जन्म झाला. बालपणापासूनच कष्ट ,परिश्रम अंगवळणी पडल्यामुळे त्याचे भांडवल न करता त्याच बळावर कोणतही काम त्रासदायक वाटून न घेता हसतमुखाने स्वीकारण्याची प्रवृत्ती बळावत गेली. त्याचा फायदा पुढील नाट्य क्षेत्रातही झाला.दहाव्या वर्गात शिकत असतानाच मोठी बहीण आरती शामकुळे यांच्या प्रेरणेने तिला भूमिका करण्याची संधी मिळाली. नाट्यशास्त्राचे कोणतेही धडे न घेता व प्रशिक्षणही न घेता केवळ इतरांच्या वेगवेगळ्या भूमिका पाहून अनुकरणाने व अनुभवाने शिकत स्वतःला घडवत पायलने झाडीपट्टी रंगभूमीवर विविध भूमिका साकारणे सुरू केले. परमवीर हौशी गावागावातील नाट्य मंडळाच्या स्टेजवर अभिनयाचा प्रवास सुरू केला. प्रल्हाद रंगभूमी, गणराज रंगभूमी, स्वतंत्र हौशी नाट्य कला मंडळाच्या माध्यमातून विविध भूमिका साकारत तिने चंद्रकमल थिएटर्स सिंदेवाही ,वडसा या नाट्य मंडळात मागील सतरा वर्षापासून नाट्य कलावंत म्हणून विलक्षण अभिनयाने आपली नाममुद्रा झाडीपट्टीत कोरत आजतागायत कार्यरत आहे. पुयार येथील तबलावादक तुलशी कडूकर यांच्याशी पायलचा २००७ मध्ये विवाह झाला. संसार वेलीवर बहरलेला चि. तन्मय हा त्यांचा मुलगा दहाव्या वर्गात शिक्षण घेतो आहे. नाट्यकलावंत पायल हिने
रक्तात रंगला गाव, घुंगरू पेटले सुडाने, प्रीत जमली चाळातून, डाकू मानसिंग, अखंड राहो प्रीत साजना, सांग सख्या जगू कशी, तुफान, दिवा नाही दारी, देव्हारा, बाईच्या चुड्यात सरपंच कोड्यात, विखुरले मोती संसाराचे ,पेटला सारा गाव आता विझव रे बाबुराव ,उपकार, कालचक्र, रात्र विझली आसवांनी, खेळ नशिबाचा यासारख्या शेकडो नाटकातून चरित्र प्रधान, नर्तिका ,विनोदी अशा विविधांगी भूमिका पायलने उत्तम साकारल्या आहेत. सामाजिक ,कौटुंबिक, चरित्रप्रधान नाटकाबरोबरच ‘डाकू मानसिंग ‘सारख्या डाकू जीवनावरील नाटकातही पायलने भूमिका केली आहे.
दहाव्या वर्गात शिकत असताना मिणघरी येथे ‘सांग सख्या जगू कशी’ या नाटकातीन पदार्पणापासून , घुंगरू पेटलं सुडान ते भलतच घडलं … वेडाच्या भरात’ या नाटकापर्यंत आजतागायत रसिक प्रेक्षक वर्ग तिच्या चतुरस्त्र अभिनयाला दाद देत मनमुराद आनंद लुटतात. ज्येष्ठ रंगकर्मी निर्माता, दिग्दर्शक, कलावंत प्रा. डॉ .शेखर डोंगरे सर व ज्येष्ठ कलावंत सेनि.प्राचार्य आत्माराम खोब्रागडे सर यांच्या मार्गदर्शनामुळे नाट्यक्षेत्रात मला बरेच काही शिकता आल्याचे पायल प्रामाणिकपणे कबूल करतात. चंद्रकमल थिएटर्स म्हणजे आम्हाला आमचं कुटुंब , परिवार वाटतो. या मंडळाविषयी प्रचंड आत्मीयता निर्माण झाली असून आम्ही प्रेमाने हक्क गाजवू शकतो, जुन्या प्रेस मधले वाईट अनुभव इथे मात्र येत नाहीत .एका चांगल्या प्रेसमध्ये काम करण्याचा आनंद मिळतो. प्रारंभीच्या काळात सिंगल लेडीजच्या नाटकामध्ये काम करताना मात्र खूप कस लागायचा. रात्रभर अभिनय करताना दमछाक व्हायची , बाहेरगावी नाटकाकरिता जाण्याकरिता दळणवळणाची कोणतेही साधने नसल्यामुळे प्रचंड गैरसोय, कष्ट,त्रास आणि मन:स्ताप सहन करावा लागायचा,हा अनुभव त्या कथन करतात . किंबहुना जुनोना येथे झालेला ‘ घुंगरू पेटले सुडाने’ या नाटकाकरिता जाण्यास कोणतेही साधन न मिळाल्यामुळे एसटी बसही न मिळाल्यामुळे प्रयोगाकरिता उपस्थित राहता आले नाही. तेथील आयोजक मंडळांच्या आग्रहास्तव मात्र दुसऱ्या दिवशी नाट्यप्रयोग करावा लागल्याचा कटू प्रसंग सांगतात.
‘पेटला सारा गाव ‘मधील मोहिनी , तुफान मधील नर्तिका, बाईच्या तिढ्यात सरपंच कोड्यात’ या नाटकात तर मीना ,लक्ष्मी अशा तीन भूमिका एकाच वेळी तिला कराव्य लागल्या आहेत. झेंडा मधील वैशाली ,गहाण, फाटका संसार मधील दुर्गा विळखातील जानू,भूक मधील लैला ,का रक्तपिता गरिबाचे मधील पूजा, व्यथा एका संसाराची मधील पौर्णिमा, कसोटी कुंकवाची मधील कस्तुरी ,फाटका संसार मधील दुर्गा, पापीपुत्र मधील करुणा ,बायको पेक्षा मेहुणी बरी मधील रमैया , बायको डोक्यावर चढली मधील रूपा ते भलतच घडलं वेडाच्या भरात मधील शेवंता अशा विविध लक्षवेधी भूमिका पायलने सिद्धहस्तपणे साकारल्या आहेत. टाकलेलं पोर मधील रखमा, अहंकार मधील मोनिका, आणि भूक मधील लैला या भूमिका लोकप्रिय ठरल्या. या भूमिकेने झाडीपट्टी रंगभूमीवर वेगळी ओळख निर्माण केल्याचे समाधानही हसतमुखाने पायल व्यक्त करतात. चरित्र विनोदी , नर्तिका , सत्वपरीक्षा नाटकातील प्रेमळ सून, कजाग भांडखोर सासू म्हणून जशी पायलची ओळख आहे; तशीच ‘विखुरले मोती ‘या नाटकातील कल्पना ही खलनायकाची भूमिका ही तिने उत्तम वटविली आहे. दिलखेचक अदाच्या बहारदार नृत्यामुळे व मधूर गायनामुळे आजतागायत पायल झाडीपट्टीत रसिकप्रिय ठरत आपले विलक्षण स्थान निर्माण केले आहे. गायन व नृत्यात तरबेज उत्कृष्ट संवादफेक, प्रसन्न चेहऱ्यामुळे विविध भूमिका प्रभावीपणे साकारत नाटकातून प्रेक्षकांचे रंजन व समाजप्रबोधन त्या करीत आहेत.’ धुंद शराबी मौसम सुहाना है ,नाचे गाये झुमो ,आज कुछ होने वाला है ” या गीताला तर प्रेक्षक भरभरून दाद देत त्यांच्या विलक्षण अभिनयाविषयी पसंती दर्शवितात. प्रचंड स्टेज डेरिंगमुळे भूमिकेनुरूप प्रभावी अभिनय, प्रसन्न व्यक्तिमत्व, भावदर्शी सुंदर रूप, तेज:पुंज डोळे,पात्रागणिक बदलत जाणारी भावमुद्रा, संवादामधला आशय लक्षात घेऊन बोलण्याची ढब, प्रणयप्रसंगातील लाडिकपणा , संघर्षातील आक्रमकता यामुळे एक समर्थ कलावंत असल्याचा प्रत्यय नाट्यानुभवातून होतो. पायलने झाडीपट्टी बरोबरच सीमावर्ती तेलंगणा व मध्यप्रदेश राज्यातील विविध गावांमध्येही अनेक नाटकातूनतिने अभिनय केलेला आहे.. तसेच नागपूर येथे झालेल्या मिल्का हे नाटक झाडीपट्टी नाट्य महोत्सवातील फाटका संसार टाकलेले पोर या नाटकाबरोबरच साधारणतः२००० विविध झाडीपट्टीच्या नाटकातून वेगवेगळ्या भूमिका विविध भावाविष्कारासह कमालीच्या प्रत्ययकारकतेने साकार केलेल्या आहेत.कलेच्या आनंदाबरोबरच नाटकातील मानधनामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी निश्चितच मदत होते. पायलचा रंगमंचीय प्रवास हा अनोखा व प्रेरणादायी आहे.किंबहुना कलेची उपासना करत अभिनयाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीने कुटुंबाचा उदरनिर्वाहकरिता तिने घेतलेले पुढाकार महत्त्वपूर्ण आहे. यामुळे पायलचा धानोरा येथे उत्कृष्ट कलावंत म्हणून गौरव करण्यात आला. तद्वतच महाराष्ट्र शासन सांस्कृतिक संचालनालय आयोजित झाडीपट्टी सांस्कृतिक महोत्सव मुल येथेही उत्कृष्ट स्त्री कलावंत म्हणून पायल यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. परिश्रमी, जिद्दी ,स्वाभिमानी, सदा हसतमुख, महत्त्वकांक्षी, प्रचंड आत्मविश्वास व ऊर्जा असणाऱ्या, भूमिकेशी पूर्णत: समरस होणाऱ्या बिनधास्त शैलीच्या नाट्य कलावंत पायलच्या नाट्यकलानिष्ठेला मनापासून सलाम.
प्रा. राजकुमार मुसणे, गडचिरोली

