ठाणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – सरळ सेवा भरती- २०२३ अंतर्गत आरोग्य व सामान्य प्रशासन विभागात सरळ सेवा भरतीने निवड झालेल्या १९ उमेदवारांना दि. १७ फेब्रुवारी, २०२५ रोजी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. अध्यक्ष जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सरळ सेवा भरती अंतर्गत निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन केले. तर या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी उपस्थित उमेदवारांचे अभिनंदन करून उत्तम कामकाज करण्याबाबत शुभेच्छा दिल्या.
आरोग्य विभागातील आरोग्य सेवक (महिला) ०७ पद, आरोग्य सेवक (पुरुष) ०७ पद तर सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ सहाय्यक ०५ पद अशा एकूण १९ नव नियुक्त उमेदवारांना आदेश निर्गमित करण्यात आले आहे.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, कार्यकारी अभियंता (बाधंकाम) संदिप चव्हाण, कार्यकारी अभियंता (लघुपाठबंधारे) दिलीप जोकार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. समिर तोडणकर, जिल्हा समाज कल्याण विभाग प्रमुख उज्वला सपकाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे तसेच जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत गट – क सरळ सेवा भरती करण्यासाठी दि. ५ ऑगस्ट, २०२३ रोजी विविध संवर्गातील २५५ पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. आयबीपीएस या संस्थेद्वारे सदर परिक्षा घेण्यात आली असून गुणवत्तेनुसार निवड करण्यात आली. सर्व संवर्गाचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. इतर प्रतिक्षा यादीवरील पात्र उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणी सुरू असून लवकरच प्रतिक्षा यादीवरील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येतील.

