जगदीश वडजे नाशिक जिल्हा प्रतिनिधी – कर्मवीर रा. स. वाघ शैक्षणिक व आरोग्य संस्था संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राजारामनगर येथे विद्यार्थी विकास मंडळ, NSS विभाग व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न झाला.
जागतिक मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आजच्या कार्यक्रमाला लाभलेले मान्यवर प्रा.एस.एन.भुसाळ व श्रीमती एन.के.जाधव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मराठी भाषेची थोरवी, तिची उत्पत्ती आणि विकास यावर साधार विवेचन केले. वेगवेगळ्या कालखंडात मराठी भाषेचे स्वरूप कसे होते, विविध टप्प्यांवर तिने कसे वळण घेतले व तिच्यात कसे परिवर्तन घडून आले याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतातून कोरीव लेख-शिलालेख -ताम्रपटांपासून सुरू झालेला मराठीचा प्रवास पुढे आद्य कवी मुकुंदराज, स्वामी चक्रधर, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संतमेळ्यातील अठरापगड जातीतील संत, संत एकनाथ, संत तुकाराम व संत रामदास या परंपरेच्या माध्यमातून प्रवाहित राहिला. पुढे आधुनिक काळात अनेक लेखक कवींनी हा प्रवाह आपापल्या परीने समृद्ध केला. त्यात मोलाची भर घातली ती कविवर्य कुसुमाग्र यांच्या बहुरंगी- बहुढंगी लेखन शैलीने… कवी कुसुमाग्रज यांच्या काव्याचे सखोल विश्लेषण प्राचार्य श्री. गवळी एन.व्ही. यांनी यावेळी मांडले.
सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे नॅक समन्वयक प्रा.सोनवणे, मराठी विभाग प्रमुख श्रीमती लोखंडे, श्रीमती पाटील, श्रीमती कावळे, विद्यार्थी विकास अधिकारी श्रीमती पासारे , रासेयो अधिकारी श्री. पवार, तसेच सर्व विभाग प्रमुख आणि सर्व सहकारी प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

