मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय शहापूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त मार्गदर्शन
जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674
भंडारा – २१ व्या शतकात स्त्रीयांनी सर्व क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. याचे श्रेय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जाते. सावित्रीबाईंनी शिक्षणाचे दारे उघडून आमच्या साठी प्रगतीचे दालन उघडे करून आम्हाला अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य दिले. यातुनच नौकरी, शिक्षण, खेळ अशा अनेक क्षेत्रांत आम्हाला संधी मिळाली आहे. परंपरा वादी दृष्टीकोन झुंगारून आम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारले आहे. त्यातूनच स्त्रीया स्वावलंबी झाल्या आहेत. मात्र तरूण युवक-युवतीने मोबाईलचा वापर चांगल्या गोष्टींसाठी करावा. आई – वडिल अडाणी, अशिक्षित किंवा गरिब असले तरी तडजोड करून उच्च शिक्षण देण्यासाठी कुठलीही कसर सोडत नाही. आपल्या मुला-मुली कडून खुप अपेक्षा असतात. त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरू नका. ध्येय निश्चित करून यश संपादन करावे. म्हणून पुढील पिढीसाठी मुलांबरोबर स्त्री शक्तीचा जागर करणे हीच आमची, मोठ्यांची नैतिक जबाबदारी आहे. असे प्रतिपादन भारतीय आट्यापाट्या संघाची कर्णधार तथा स्वर्णपदक विजेती कु. प्राची केशव चटप यांनी केले. त्या मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय शहापूर येथे आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त मार्गदर्शन करतांना बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रल्हाद हरडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय आट्यापाट्या संघाची कर्णधार तथा स्वर्णपदक विजेती कु. प्राची केशव चटप, बाल उदय संस्थेच्या सानिका वडनेरकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. दीपाली ईश्वरकर, प्रा. अजय मोतीवाल, दुर्गा चटप, विलास केजरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, विदर्भ शिक्षण महर्षी स्व. मनोहरभाई पटेल व सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व मार्ल्यापण करून दीप प्रज्वलित करण्यात आले.
सावित्रीबाई फुले यांनी हाल अपेष्टा सहन केल्यामुळे आज महिलांना विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याची संधी मिळाली आहे. कुठल्याही निकालाची परंपरा पाहिली असता मुलींच अग्रेसर राहतात. आज नवनवीन प्रकरणे पहायला मिळतात म्हणून मुलीने सावध राहणे गरजेचे आहे असे मत बाल उदय संस्थेच्या सानिका वडनेरकर यांनी मांडले.
ग्रामीण भागातील विद्यार्थिनी कु. प्राची चटप हीने प्रतिकुल परिस्थितीवर मात करून आपल्यातील कला कौशल्याच्या भरोश्यावर भारतीय आट्यापाट्या संघाची कर्णधार व भारतासाठी स्वर्णपदक मिळवून दिले. तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण सुद्धा आई-वडिल, गाव, जिल्हा व महाविद्यालयाचे नाव लौकिक करावे असे आवाहन मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रल्हाद हरडे यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या परिसरात महिलांना संदेश देणाऱ्या विविध रांगोळ्या काढल्या होत्या. उपस्थित मान्यवरांनी विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शितल गभणे व प्रास्ताविक प्रा. डॉ. साहिद अखत्तर यांनी केले तर उपस्थितांचे आभार कार्यक्रम समन्वयक प्रा. दीपाली ईश्वरकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रा. प्रशांत लांजेवार, प्रा. स्वाती कोल्हटकर, दिक्षा शेंदरे, आयुष वैद्य व मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यार्थी -विद्यार्थिनींनी सहकार्य केले.

