आमदार सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई प्रतिंनिधी प्रबोधिनी न्युज – दि. 21: आणीबाणीच्या काळात कुटुंबाचा आणि स्वतःचा जराही विचार न करता केवळ “राष्ट्र सर्वोपरी” म्हणून देशासाठी, जनहित हेच कर्तव्य मानत करावास भोगून संघर्ष करणाऱ्या लोकतंत्र सेनानींच्या सन्मान निधित भरीव वाढ करण्याची मागणी बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार व ज्येष्ठ भाजपा नेते श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यामंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या सविस्तर निवेदनात श्री. मुनगंटीवार यांनी राजस्थान सरकारच्या निर्णयाचा दाखला दिला आहे. आणीबाणीमुळे देशाच्या लोकशाहीचे महत्व लक्षात घेऊन लोकतंत्र सेनानी म्हणून ज्यांनी करावास पत्करला त्या सर्व लोकतंत्र सेनानींचा सन्मान करणे ही शासनाची जबाबदारी आहे, असे निवेदनात म्हटले असून अतिशय हाल अपेष्टा सहन करत “भारत माता की जय” म्हणत या लोकतंत्र सेनानींनी निरपाराध असूनही हृदयामध्ये राष्ट्रभक्तीचा भाव घेऊन आणीबाणीमध्ये हाल सहन केले. या लोकतंत्र सेनानींनी हे हाल सहन केले नसते, संघर्ष केला नसता तर कदाचित लोकशाही मानणाऱ्या देशाचा हुकूमशाहीकडे प्रवास झाला असता, असेही म्हटले आहे.
राजस्थान सरकारने लोकतंत्र सेनानी सन्मान म्हणून पेन्शन राशी 20 हजार रुपये केली आहे. तसेच आरोग्य चिकित्सा सहाय्य म्हणून 4 हजार रुपयांची राशी दर महिन्याला तेथे दिली जाते. महाराष्ट्रात सध्यस्थितीत 4 हजार 103 स्वातंत्र्य सेनानी सन्मान निधीस पात्र आहेत.
राजस्थान सरकारची अधिसूचना लक्षात घेऊन महाराष्ट्रात देखील हा सन्मान निधी वाढविण्यासाठी स्वतः पुढाकार घ्यावा अशी विनंती आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सदर निवेदनाद्वारे केली आहे.

