वाशिममध्ये शेतमाल विक्री महोत्सवाचे थाटात उद्घाटन: चिया लागवडीत देशात अव्वल स्थान, शेतकऱ्यांचा उत्साह व ग्राहकांची गर्दी
उषा नाईक जिल्हा संपादिका, वाशिम – दि.२२ मार्च : एस्पिरेशनल ते इन्स्पिरेशनल ही कृषीच्या बळावर वाशिमची नवी ओळख घडवण्याचा संकल्प जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी व्यक्त केला. वाशिम जिल्ह्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान आणि पौष्टिक तृणधान्य योजना अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय शेतमाल विक्री महोत्सवाला आजपासून स्व. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण केंद्र, काटा रोड येथे सुरुवात झाली. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांच्याहस्ते या दोनदिवसीय महोत्सवाचे थाटात उद्घाटन झाले. यावेळी बुवनेश्वरी बोलत होत्या. यावेळी कृषी सहसंचालक प्रमोद लहाळे, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह, आत्माच्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे आणि कृषी उपसंचालक अजय मोरे, हिना शेख उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके, जिल्हा कृषी विकास अधिकारी अभिजीत देवगिरकर, कृषी विज्ञान केंद्र करडाचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आर. एल. काळे, केवीकेचे शास्त्रज्ञ डी.डी.गीते, रेशीम विकास अधिकारी सुनील फडके यांच्यासह सर्व तालुका कृषी अधिकारी, यांची प्रमुख उपस्थिती होती. आज दि.२२ मार्च रोजी पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांचा उत्साह आणि ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
उद्घाटनप्रसंगी पुढे बोलतांना जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी म्हणाल्या, “निती आयोगाने वाशिमला ‘ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट’ म्हणून घोषित केले आहे. पण आम्ही कृषी उत्पादनाच्या माध्यमातून ही ओळख पुसून जिल्ह्याला ‘इन्स्पिरेशनल डिस्ट्रिक्ट’ बनवण्याचा निर्धार केला आहे. गेल्या दोन वर्षांत चिया लागवडीचे क्षेत्र १०० हेक्टरवरून ३ हजार ६०० हेक्टरपर्यंत वाढले आहे. आज वाशिम चिया लागवडीत देशात प्रथम क्रमांकावर आहे, हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. यासाठी कृषी विभाग, शेतकरी बांधव आणि खरेदीदार कंपन्या अभिनंदनास पात्र आहेत.” त्यांनी पुढे सांगितले, “शेतकऱ्यांना कमी पाण्यात चांगले पीक आणि योग्य मोबदला मिळावा, यासाठी नावीन्यपूर्ण पिकांची लागवड पुढेही सुरू राहील. हा महोत्सव शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणारा ठरणार आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा.
जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करताना कृषी सहसंचालक श्री.लहाळे म्हणाले, “श्रीमती बुवनेश्वरी एस यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष आणि कौशल्यपूर्ण जिल्हाधिकारी मिळणे हे वाशिमचे भाग्य आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळवून देण्यासाठी इतके प्रयत्न करणारे अधिकारी दुर्मीळ असतात. त्यांच्या नेतृत्वाखाली वाशिम जिल्हा कृषी क्षेत्रात नवी उंची गाठत आहे. चिया लागवडीतील यश हे त्यांच्याच दूरदृष्टीचे फळ आहे.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह म्हणाले, “चिया पिकाची संकल्पना जिल्हाधिकारी यांचीच आहे. कमी पाणी, कमी मेहनत आणि जास्त उत्पन्न हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही संकल्पना प्रत्यक्षात आणली गेली. अवघ्या दोन वर्षांत वाशिम देशात चिया उत्पादनात प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे. या महोत्सवासाठी सर्व कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. जिल्हाधिकारी केवळ महसूलच नव्हे, तर सर्व विभागांचे, विशेषतः कृषी विभागाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या परिश्रमामुळे वाशिमला राज्यात नवी ओळख मिळत आहे.”या महोत्सवात शेतकऱ्यांनी ग्राहकांना थेट धान्य, फळे, भाजीपाला यांसारखी ताजी उत्पादने विक्रीस उपलब्ध करून दिली. सेंद्रिय उत्पादनांचे स्वतंत्र दालन, बचत गटांचे विक्री दालन, कृषी प्रक्रिया उत्पादनांचे दालन आणि खवय्यांसाठी खाद्य पदार्थांचे विशेष दालन अशी वैविध्यपूर्ण व्यवस्था होती. १५० स्टॉल्सवर शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी बचत गट आणि महिला बचत गटांनी आपली उत्पादने मांडली होती. चिया पिकांसाठी खरेदीदार-विक्रेता संमेलन आयोजित करण्यात आले, ज्यात राज्यातील आणि राज्याबाहेरील खरेदीदारांनी सहभाग घेतला.जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी महोत्सवाला भेट देत सर्व स्टॉल्सना प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी शेतमाल विक्रेते, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि उद्योजकांशी संवाद साधला. शेतकऱ्यांकडून त्यांच्या उत्पादनांबाबत, सेंद्रिय शेतीबाबत आणि बाजारपेठेतील मागणीबाबत माहिती घेतली. त्यांच्या या भेटीमुळे शेतकऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला. “शेतकऱ्यांचे अनुभव ऐकणे आणि त्यांच्या गरजा समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, हाच आमचा प्रयत्न आहे,” असे त्यांनी शेतकऱ्यांशी बोलताना सांगितले. शेतकऱ्यांनी पूर्वीच्या तुलनेत चियाची अधिक दराने विक्री केल्याने बाजारावर चांगला परिणाम झाला आहे. वाशिम जिल्ह्यात चिया लागवडीच्या यशामुळे आणि वाढीमुळे ते खूप आनंदी आहेत. कर्नाटक येथील चिया उत्पादनापेक्षा वाशिमचे उत्पादन जास्त आहे. या यशामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाली आहे. वाशिम जिल्ह्यातील कृषी विभाग शेतकऱ्यांना लागवडीसाठी वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करत आहे. दि. २३ मार्च रोजी इतर शेतमालासाठी खरेदीदार-विक्रेता संमेलन होणार असून, पिकानिहाय खरेदीदारांशी सामंजस्य करार केले जाणार आहेत. वाशिम जिल्हा आणि शहरातील नागरिक, शेतकरी आणि ग्राहकांनी या महोत्सवाला मोठ्या संख्येने हजेरी लावली. “हा महोत्सव शेतकऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. आम्हाला ताजी आणि दर्जेदार उत्पादने मिळाली,” अशी प्रतिक्रिया एका ग्राहकाने दिली. हा महोत्सव २३ मार्चपर्यंत सुरू राहणार असून, सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
वाशिम जिल्हा आता कृषी क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे. चिया लागवडीतील यश आणि शेतकऱ्यांचा उत्साह यामुळे हा जिल्हा देशभरात चर्चेत आला आहे. ‘वाशिम शेती शिल्प’ ब्रॅंडच्या लोगोचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाला कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी, नागरिक, शेतकरी, व्यावसायिक, खरेदीदार आदी उपस्थित होते. संचालन हिना शेख व गोपाल मुठाळ यांनी केले.आभार संतोष वाळके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.

