प्रशांत देशपांडे ब्युरो चीफ प्रबोधिनी न्युज नेटवर्क 8855997015
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘12व्या लोकमत सूर ज्योत्सना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ सोहळा नागपूर येथे संपन्न झाला. यावेळी त्यांनी उपस्थित संगीतप्रेमींशी संवाद साधला व संगीत क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या अनेक प्रतिष्ठित उदयोन्मुख आणि प्रसिद्ध संगीत प्रतिभांचा पुरस्कार देऊन सन्मान केला.
ज्योत्सना दर्डा यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेला हा पुरस्कार सोहळा त्यांच्या संगीतप्रेमाचा आणि योगदानाचा सन्मान आहे. संगीत प्रेमी ज्योत्सना दर्डा यांनी ‘लोकमत सखी मंच’च्या माध्यमातून राज्यभरातील महिलांना एकत्रित आणून संगीतसंस्कृती समृद्ध करण्याचे कार्य केले. या सोहळ्याद्वारे देशातील प्रतिभावान आणि उदयोन्मुख कलाकारांना सन्मानित करण्याची परंपरा पुढे सुरू राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
लीजेंडरी कॅटेगरीतील पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकरजी यांना प्रदान करणे नेहमीच स्मरणात राहील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्या स्वतःच एक लीजेंड आहेत आणि जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत, तोपर्यंत मंगेशकर कुटुंबियांचे योगदान भारतीय संगीतसृष्टीत अढळ राहील, असा गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. उषा मंगेशकरजी यांच्या सुरेल गायकीने पाच दशके रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी शास्त्रीय संगीतासाठी अनिरुद्ध ऐठल, सुगम संगीतासाठी अंकिता नंदी व अंतरा नंदी, तसेच गझल गायनासाठी तलत अझीझ यांना संगीत क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करत या सोहळ्याच्या माध्यमातून भारतीय संगीताची समृद्ध परंपरा अधिक वृद्धिंगत होत राहील, अशी भावना व्यक्त केली.
या वेळी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार कृपाल तुमाने, आमदार परिणय फुके, आमदार प्रवीण दटके, ‘लोकमत’ माध्यम समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

