शब्द शब्दाला जोडून
भाव मनातले मांडतो
कवी शब्दाचा जादूगर
शब्दाच्या रंगात रंगतो …
जादूगरी शब्दांची खेळून
परक्यांनाही आपलेसे
करीत काळजात रूजून
घर करतो हलकेसे….
ओळखून कवीचे लेखन
समर्पक शब्दांची निवड
अक्षरांच्या सोबतीने छंद
जपतो कवितेची आवड …
कवी हळवे असूनी ठेवी
लेखणीतून करतो प्रहार
अन्यायाविरुद्ध लढताना
चढवी लेखणीला धार …
कवितेला अर्थपूर्ण लिहिणे
सोपे नाही कवितेच्या मुळात
शब्द शब्द जुळवता होते
दमछाक यमकाच्या रूपात ….
शब्दाचा जादूगर कवी
जो न देखे कधी रवी
तेच दिसते कवीमनास
तीच दाखवी आपली छवी…
एकेक शब्द मनाचा घेतात
अंतरातील भावनाचा ठाव
कधी शब्द रागातले पुढच्या
मनाला देतात खोल घाव….
कधी प्रेमळ शब्दाचा संवाद
दुरावले नाते जोडते पुन्हा
पण सल मनातली कमी होता
होता वाटे काय झाला गुन्हा…
प्रा.नानाजी रामटेके
आरमोरी, गडचिरोली

