जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
9665175674
भंडारा – गोंदिया शिक्षण संस्थेद्वारा संचालित सेठ नरसिंगदास मोर कला, वाणिज्य व श्रीमती गोदावरी देवी सराफ विज्ञान महाविद्यालय तुमसर येथे नुकतीच राज्यस्तरीय एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. वाणिज्य विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. “उद्योजकता व कौशल्य विकास” (Entrepreneurship & Skill Development) या विषयावर ही कार्यशाळा घेण्यात आली.
विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता व कौशल्य विकास या बाबी स्पष्ट होऊन तरुण उद्योजक घडविणे हा कार्यशाळेचा उद्देश होता. या कार्यशाळेसाठी प्रमुख अतिथी तथा संसाधन व्यक्ती म्हणून दुर्गाप्रसाद वाहाने (प्रोप्रायटर – धनाचल आमला प्रॉडक्ट, पिपरा) आणि अनिल जीभकाटे (श्री श्री लाकडी घानी तेल उद्योग,तुमसर) हे उपस्थित होते. या कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. कोमलचंद साठवणे हे उपस्थित होते. तसेच IQAC चे माजी समन्वयक डॉ. राधेश्याम दिपटे हेसुद्धा उपस्थित होते.
या कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात प्रमुख अतिथी दुर्गाप्रसाद वाहने यांनी उद्योग स्थापन करताना कोणकोणती प्रक्रिया पार पाडावी लागते याबाबत मार्गदर्शन केले. तसेच कर्जाची उपलब्धता, प्रत्यक्षात येणार्या अडचणी व त्यावरील उपाय समजावून सांगितले. त्यांनी स्वतः सुरू केलेला आवळा उद्योग आणि त्यापासून तयार केलेली विविध उत्पादने याबद्दल सविस्तर माहिती दिली.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रामध्ये प्रमुख अतिथी अनिल जिभकाटे यांनी बाजारातील तेल व लाकडी तेलघानीतून मिळणारे तेल यातील फरक समजावून सांगितला. लाकडी तेलघानी तेलाचे वेगवेगळे प्रकार, त्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे आणि महत्त्व याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. कोमलचंद साठवणे यांनी विद्यार्थ्यांना उद्योगाबाबत पुढील काळात येणारे अडथळे व त्यावरील उपाययोजना याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेसाठी एकूण 158 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यशाळेचे प्रास्ताविक वाणिज्य विभागप्रमुख डॉ. हितेश कल्याणी यांनी केले. या कार्यशाळेचे संयोजक (Convener) डॉ.व्यंकटेश मोरे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा.लक्ष्मण पेटकूले यांनी आभार मानले. या कार्यशाळेस महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

