महाकाली यात्रा परिसरात शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता कार्यक्रमाला होणार सुरुवात
चैत्र नवरात्र महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्री माता महाकाली यात्रेनिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर विधानसभा तसेच श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वतीने भव्य भक्तिमय स्वर संध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर आपल्या सुमधुर आवाजातून भक्तिरसाचा वर्षाव करणार आहेत. हा कार्यक्रम उद्या शुक्रवार, दि. ११ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता मह्कली यात्रा परिसरात संपन्न होणार आहे.
शहनाज अख्तर यांचे हे खास सादरीकरण भाविकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे. कार्यक्रमासाठी संपूर्ण परिसर आकर्षक पद्धतीने सजवण्यात आला असून, महाकाली मातेचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. शहनाज अख्तर यांनी याआधीही अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांतून आपली खास ओळख निर्माण केली आहे, आणि त्यांच्या सादरीकरणाने भाविक मंत्रमुग्ध होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.मातेच्या भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

