मूल, प्रतिनिधी – जागृत ग्राहक राजा मूलच्या वतीने दिनांक ११एप्रिल २०२५रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन मूल येथील रेल्वेस्थानकावर करण्यात आले होते.
महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करीत या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, याप्रसंगी संघटनेचे नागपूर विदर्भ प्रांत प्रमुख दीपक देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात मूल रेल्वे स्थानक प्रमुख करमनकर साहेब प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा गौरव करीत स्वातंत्र्य पूर्व काळातील परिस्थिती आणि आजची परिस्थिती केवळ दृश्य स्वरूपात वेगळी असली तरीही समस्या संपलेल्या नाहीत उलट आज त्यांचे स्वरूप भिन्न असून फसवणूक , लुबाडणूक यांचे प्रमाण वाढले आहे. तेव्हा अनपढ अशिक्षीत समाजाला सुशिक्षित करण्याचा त्यांनी विडा उचलला आणि त्यासाठी विरोध स्विकारुनही समाज जागृती करण्याचे कार्य त्यांनी यशस्वीपणे पार पाडले म्हणून आजचा दिवस त्या कार्याची स्मृती जागी करण्यासाठी आपण साजरा करीत असतांनाच ही गोष्ट विसरता कामा नये की तेंव्हा समाज अशिक्षित होता पण आज समाज सुशिक्षित असूनही त्यांची फसवणूक लुबाडणूक होत आहे अशा स्थितीतसाठी आपल्याला त्यांचे अधिकार आणि कर्तव्ये समजावून पटवून देण्याचे महाकठीण काम पुर्णत्वास न्यायचे आहे आणि या सुशिक्षित समाजाला प्रबोधन करायचे आहे .
आणि हे कार्य त्या परिस्थिती पेक्षाही फार बिकट आहे,कारण इथे आपल्याला तुमचे कार्य अतिशय स्तुत्य आहे असे म्हणणारे शेकडो नव्हे हजारो मिळतात आणि मिळतील पण आपल्या सोबत मदतीला येणारे बोटावर मोजता येण्याएवढे असतील आणि हे सत्य स्विकारत आपल्याला माणसं जोडायची आहेत त्यांना या संघटनेचे महत्त्व पटवून द्यायचे आहे, आणि समाजात काहीही काम नसणाऱ्यांचे उलट टोमणे ऐकावे लागणार आहे ही वास्तविकता स्विकारुन प्रवाहाच्या विरुद्ध आपला लढा असणार आहे आणि यासाठी आपल्याला तन मन आणि धनाने या यज्ञकुंडात समर्पित होऊन कार्य करायचे आहे ,असे प्रतिपादन दीपक देशपांडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले.
संघटनेचे सचिव रमेश डांगरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाचे आयोजनाचा उद्देश आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला आणि त्यांच्या आदर्शाचा आपल्या जीवनात कसा प्रभाव पडला होता यांचे सुंदर विवेचन केले, आणि संघटनेच्या वाढिसाठी त्यांच्या कार्याचा आदर्श कसा अंमलात आणता येईल यांचाही विचार करण्याची वेळ आली आहे असे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश डांगरे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ आनंदराव कुळे यांनी केले.या कार्यक्रमाला दीपक देशपांडे, रमेश डांगरे, तुळशीराम बांगरे संघटक, डॉ आनंदराव कुळे,डोमाजी बट्टे, दिलीप कटलावार हे संघटनेचे कार्यकारिणी सदस्य,व इतर कार्यकर्ते , रेल्वे कर्मचारी व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

