अवैध व्यवसायामुळे तरुण पिढी व्यसनाधीन
जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष
सुरेखा गांगुर्डे – : देवळा तालुका प्रतिनिधी
देवळा पोलीस ठाण्याच्या आशीर्वादाने देवळा तालुक्यात अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असून यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. पर्यायी तालुक्यातील गरीब व दलित, आदिवासी समाजातील नागरिक प्रामुख्याने या पाशात अडकल्याने अनेक संसाराची राख रांगोळी होतांना दिसत आहे.
पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बोकाळले असल्याने तालुका व शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी नाशिक जिल्ह्यातील अवैधरीत्या चालणार्या धंद्यांना चाप लावली होती मात्र त्यांच्या बदली नंतर अवैध धंदे चालकांना अभय मिळाले आहे. यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर देखील टीका केली जात आहे. तालुक्यात राजरोसपणे अवैध दारू, घुटका, मटका, सट्टा, झुगार आदींसह विविध धंदे जोमाने सुरू झाले आहे. हे धंदे बंद करण्यात यावे अशी मागणी आता तालुक्यातून होऊ लागली आहे. देवळा पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या अनेक गावांमध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहे अवैध दारू, वरली मटका, जुगार तसेच विनापरवाना ढाबे हे मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शांतता भंग होऊ नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हे अवैध धंदे बंद होणे आवश्यक आहे. तालुक्यात अनेक समाजसेवक आहे मात्र याबाबत कुणीही आवाज उठवताना दिसत नाही. तालुक्यातील गरीब जनतेचे संसार उद्ध्वस्त होऊ नये यासाठी अवैध धंदे बंद होणे आवश्यक असल्याने तीव्र जन आंदोलन होणे आवश्यक आहे

