प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयाची कारवाई
गडचिरोली दि . १९: गडचिरोली जिल्ह्यातील देऊळगाव खरेदी केंद्रात उघडकीस आलेल्या धान अपहार प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था देऊळगाव येथे पणन हंगाम २०२३-२४ व हंगाम २०२४-२५ मधे आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदी करण्यात आला होता. परंतु साठा पुस्तकानुसार व प्रत्यक्ष शिल्लक धान यात प्रथम दर्शनी तफावत आढळल्यामुळे शिल्लक धानाची मोजणी व्यवस्थापकीय संचालक नाशिक यांच्या आदेशानुसार करण्यात आली.
त्या मोजणीत दोन्ही हंगामात १००८४.०८ क्विंटल धान कमी आढळून आला. त्यामुळे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था देऊळगावचे सचिव, संचालक, तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी अशा एकूण 17 जणांविरुद्ध काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा पोलीस स्टेशन कुरखेडा येथे प्रथम खबर क्रमांक 69 अन्वये नोंदविण्यात आला आहे.
देऊळगाव खरेदी केंद्रात मोठ्या प्रमाणावर धान अपहार झाल्याची बाब भेटीदरम्यान निदर्शनास आली होती. माध्यमातून यावर आक्षेपण देण्यात आले होते. याची दखल घेऊन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी देखील आरोपींवर कारवाईचे निर्देश दिले होते. आरोपींमध्ये संस्थेचे सचिव, संचालक मंडळातील सदस्य, तसेच काही कर्मचारी आणि अधिकारी यांचा समावेश असल्याचे प्रादेशिक व्यवस्थापक सोपान संभारे यांनी कळविले आहे.

