शारदा भुयार वाशिम जिल्हा प्रतिनिधी वाशिम – कारंजा (लाड) : शासनाच्या सांस्कृतिक विभागाची तालुका तेथे सांस्कृतिक सभागृह किंवा नाट्यसभागृह अशी योजना असतांनाही आजतागायत पर्यंत कारंजा तालुक्याला नाट्य सभागृह मिळाले नाही.खरेतर ही स्थानिक राजकिय नेत्यांसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे.विशेष म्हणजे कारंजा तालुक्याचे मुख्यालय असणारी कारंजा ही पुरातन नगरी आदीकाळात करंज ऋषींनी स्थापन केल्याचा उल्लेख करंजमहात्म्य ग्रंथात असून,आज ही नगरी जगाच्या नकाशावर जगप्रसिद्ध नगरी आहे.हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवरायांच्या पाऊलखूणा येथे आहेत.कापूस आणि धान्यासाठी सुप्रसिद्ध असलेली संपूर्ण आशिया खंडातील पहिली बाजारपेठ कृषी उत्पन्न बाजार समितीही सर्वप्रथम कारंजा येथे स्थापन झाली होती.स्वातंत्रपूर्व काळात स्वातंत्र्यविर सावरकर आणि महात्मा गांधी यांनी कारंजा येथे विराट सभा घेऊन येथील देशभक्तांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेतल्याचाही फार मोठा इतिहास आहे. इतिहासात कारंजा नगरीचा उल्लेख हा नेहमी सुवर्णनगरी आणि कस्तुरी नगरी म्हणूनही होत असतो. जैनांची काशी असलेल्या ह्या नगरीत मातृशक्तिपिठ श्री.कामाक्षादेवी संस्थान तसेच दत्तावतार श्री. नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे जन्मस्थळ संस्थान आहे.त्यामुळे येथे अहोरात्र सांस्कृतिक धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. शिवाय कारंजा ही सांस्कृतिक नगरी म्हणूनही ओळखल्या जाते. परंतु येथील हाडाच्या कलावंताना व्यासपिठ उपलब्ध नाही. त्यासाठी विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा यांनी कित्येकवेळा शासनाकडे, वैभवसंपन्न कारंजा नगरीत सांस्कृतिक सभागृह आणि खुले नाट्यगृह उपलब्ध करून देण्याची मागणी लावून धरली आहे. मात्र दुदैवाने शासनाकडून प्रतिसाद मिळत नाही. लोकप्रतिनिधींना भेटावं तर ते म्हणतात. “तुम्ही आम्हाला जागा उपलब्ध करून द्या.आम्ही आमच्या विकास निधीमधून बांधकाम करून देतो.” परंतू इथे प्रश्न तर असा आहे की, “मला राहायला स्वतःचा प्लॉट नाही.मी स्वतःच श्री.कामाक्षा देवी संस्थानच्या आश्रयाने राहतो. त्यामुळे मला प्रधानमंत्री आवास योजनेतून साधे घरकुल मिळत नाही तर सांस्कृतिक सभागृहासाठी प्लॉट (भूखंड) कोठून उपलब्ध करणार ?” त्यामुळे आता लोकप्रतिनिधीनीच शासनाची एखादी भूखंडाची जागा उपलब्ध करून घ्यावी किंवा शहरातील एखाद्या दिग्गज दानशूराकडून दान मागावी. व विकास महर्षी माजी आमदार स्व. प्रकाशदादा डहाके यांनी आम्हाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून त्यांचेच नावाने ” विकासमहर्षी स्व.प्रकाशदादा डहाके सांस्कृतिक सभागृह व खुले नाट्यगृहाचे बांधकाम अविलंब करावे. अन्यथा “येत्या दि. १५ जून २०२५ पासून कारंजा तहसिल कार्यालय कारंजा येथे आम्हा सर्वपक्षिय सर्वधर्मिय कारंजेकर कलावंताना उपोषण करावे लागेल.आता ‘प्राण गेले तरी बेहत्तर’ पण सांस्कृतिक सभागृह मिळविणारच.” असा विनंतीवजा इशारा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग लोककलाकार तथा विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी ह्या प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.

