अक्षय तृतीयाच्या दिवशी बालविवाह रोखण्याचे आवाहन

0
83

चंद्रपूर – दि. 29 एप्रिल : उद्या म्हणजे 30 एप्रिल रोजी अक्षय तृतीया हा सण आहे. या दिवशी मोठ्या प्रमाणात सामुहिक विवाह सोहळे तसेच वैयक्तिक विवाह आयोजित केले जातात. यामध्ये बालविवाह‌ सुध्दा मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते. राज्यामध्ये बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 कार्यान्वित असून महाराष्ट्र शासनाने बालविवाह प्रतिबंध नियम 2022 तयार केले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गत 5 वर्षात 68 बालविवाह थांबविण्यात आले असून 9 एफआयआर दाखल करण्यात आले आहे. यावर्षीसुध्दा जिल्हा प्रशासन बालविवाह रोखण्यासाठी सज्ज असून गावात बालविवाह होणार नाही, याची दक्षता सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका व सुजान नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 संपूर्ण राज्यात लागू करण्यात आला आहे. त्यानुसार बालविवाह आयोजित करणे अजामीनपात्र गुन्हा आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) हे शहरी भागाकरिता बालविवाह प्रतिबंधक अधिकारी असून, ग्रामसेवक हे ग्रामीण भागाकरिता प्रतिबंधक अधिकारी आहे. त्यांना सहायक म्हणून अंगणवाडी सेविका आहेत. गावामध्ये सरपंचांच्या अध्यक्षतेखाली ग्राम बाल संरक्षण समित्या गठित आहे. पोलिस पाटील, आशा वर्कर हे त्या समितीचे सदस्य आहेत व अंगणवाडी सेविका सदस्य सचिव आहेत. त्यामुळे गावात बालविवाह तसेच बालकांच्या संबंधित कोणतीही अघटित घटना होणार नाही, याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे.
तर होऊ शकतो कारावास आणि दंड : बालविवाह झाल्यास विवाह लावणारे भटजी, मौलवी, पादरी, भंतेजी, तसेच मंडपवाले, कॅटरिंग, वाजंत्री विवाह सोहळयात सहभागी होणारी वऱ्हाडी मंडळी, मंगल कार्यालय मालक, वर वधुचे आई-वडील हे बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अन्वये दोन वर्षाचा सश्रम कारावासाच्या शिक्षेस तसेच एक लाख रुपयापर्यंत दंडाच्या शिक्षेस पात्र असू शकेल.
बालविवाहाबद्दल माहिती देण्याचे आवाहन : ग्रामीण अथवा नागरी क्षेत्रात कुठेही बालविवाह होत असल्यास महिला व बाल विभाग अंतर्गत चाईल्ड लाईन टोल फ्री क्र.1098 (24तास), जिल्हा बाल संरक्षण कक्ष 7972059274, संस्था क्षेत्रीय अधिकारी 7304583054, असेस टू जस्टीस फॉर चिल्डेन प्रकल्प जिल्हा समन्वयक 9112796463 या क्रमांकावर, जवळचे पोलिस स्टेशन, गावातील ग्रामसेवक अंगणवाडी सेविका, बाल विकास प्रकल्प अधिकारी (शहरी /ग्रामीण) यांना त्वरीत माहिती द्यावी.
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी बालविवाह राखण्याबाबत जागृत राहावे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौड़ा जी.सी. यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here