चंद्रपूर,दि 1 : विद्यार्थ्यांच्या शारीरीक व बौध्दिक विकासाकरीता शाळांच्या परसबागेत नैसर्गिकरीत्या (सेंद्रिय अन्न) पिकवलेला ताजा व पौष्टिक भाजीपाल्याचा लाभ देण्याकरीता प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत ‘उत्कृष्ट परसबाग स्पर्धा’ आयोजित करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील एकूण 93 शाळांना 3 लक्ष 56 हजार रुपयांची बक्षीसे देण्यात आली आहेत.
शासन निर्णयात दिलेल्या 1) परसबागेची रचना / आराखडा, 2) हवामान परिस्थितीनुसार भाज्यांची लागवड, 3) परसबागेचे व्यवस्थापन, 4) विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा सहभाग, 5) उत्पादीत भाजीपाल्यांचा आहारामधील समावेश, 6) परसबागेतील भाज्याची विक्री 7) सामाजिक संस्था यांचे परसबाग उभारणीमधील योगदान, 😎 शाळेमध्ये ईको क्लबची स्थापना व त्याअंतर्गत राबवलेले उपक्रम इ. निकषांच्या आधारे गुणाकंन करण्यात येते.
मागील वर्षी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील 2004 पैकी 1735 शाळेने परसबाग तयार केली होती. प्रत्येक तालुक्यातून प्रथम, द्वितीय, तृतीय व 3 प्रोत्साहनपर शाळा अशा तालुका स्तरावरील 90 शाळांना 3 लक्ष 22 हजार 500 रुपये व जिल्हा स्तरावरील 3 शाळांना 33 हजार 500 असे तालुकास्तर व जिल्हास्तर मिळून एकूण् 93 शाळांना 3 लक्ष 56 हजार रुपयांची बक्षीसे देण्यात आली.
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी विद्यार्थी व पालकांच्या सहभागातून सुंदर व उत्कृष्ट परसबागेची निर्मिती करावी व उत्कृष्ट परसबाग स्पर्धामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) विशाल देशमुख यांनी केले आहे.

