
हिरव्या पानी नाचत होती
सदाफुलीची गोड फुले
आमोदानी गिरक्या घेत
वाऱ्यावरती सहज फुले. ||१||
मोहक त्यांच्या रंगाने
परिसर देखणा झाला
नकळत माझ्या पावलांना
जवळ घेऊनी गेला. ||२||
गोड फुलांनो, गोड फुलांनो
कोणा संगे हासता नाचता
कोणी जवळी नसतात
आनंदात कसे रमता? ||३||
सदाफुली ची राणी वदली
आम्ही आनंदाचे दूत ईशाचे
स्वानंदात रमतो आम्ही
भान नाही स्तुतीचे.||४||
जीवन आहे क्षणभंगुर हे
आम्ही आनंद गीत गातो
नाचत गात आम्ही
वनराणीची सेवा करतो.||५||
इवल्याशा त्या फुलांनी
नविन नजर मला दिली
स्वानंदात जगण्याची
नवी दिशा सदाफुलीने दिली.||६||
सौ.अंजली गरगटे, पुणे















