
मुंबई : गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनाचे वृत्तांकन करत असताना साम टीव्हीचे पत्रकार विकास मिरगणे यांच्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम आबाजी नाईक यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे पत्रकारांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वृत्तांकनादरम्यान वाहन चालक काही वस्तू आणण्यासाठी गेला होता. त्या वेळी पार्किंगच्या कारणावरून पोलिस अधिकाऱ्यांशी पत्रकार विकास मिरगणे व कॅमेरामन नितीन बोढारे यांच्यात वाद झाला. विकास मिरगणे यांनी पोलिसांना स्पष्ट केले की, ड्रायव्हर परत आल्यानंतर लगेच गाडी हलवली जाईल. मात्र तरीही सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम नाईक यांनी आक्रमक होत धावत येऊन गाडीत बसलेल्या विकास मिरगणे यांना जोरदार कानशिलता लगावली.
या प्रकरणी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाने तीव्र निषेध नोंदवला आहे. “पत्रकार हा समाजाचा डोळा व कान आहे. त्याच्यावर होणारा प्रत्येक हल्ला हा थेट लोकशाहीवर हल्ला आहे. पत्रकार आमच्या संघटनेचा असो वा नसो, प्रत्येक पत्रकाराच्या पाठीशी पुरोगामी पत्रकार संघ भक्कमपणे उभा राहील,” असे संघटनेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
संघटनेने गृहमंत्र्यांकडे संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, पत्रकार संरक्षण कायद्याची तातडीने अंमलबजावणी व्हावी, अन्यथा राज्यभर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिला आहे.
या घटनेमुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, शासनाने पत्रकारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी सर्वत्र होत आहे.















