
उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज – सततच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सरकारने तातडीने चंद्रपूर जिल्ह्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी ब्रम्हपूरी तालुका व शहर काॅंग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनात शेतकऱ्यांसाठी तातडीने आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनामध्ये म्हटले आहे की, सततच्या पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी हवालदील झाला असुन खरीप हंगामातील उभी पिके जमिनीमध्ये पूर्णपणे खराब झाली आहेत. कापणीला आलेल्या पिकांसह भाजीपाला पिकाचे सुध्दा प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून, अनेक शेतकरी आधीच कर्जबाजारी असल्याने त्यांच्यावर दिवाळखोरीचे संकट वाढत आहे.
या संकटाचा फटका केवळ शेतकऱ्यांनाच बसलेला नाही, तर शेतमजूर, व्यापारी आणि ग्रामीण उद्योगांवरही याचा नकारात्मक परिणाम झाला आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा तातडीने ओला दुष्काळ जाहीर करणे अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी काॅंग्रेसने निवेदनाव्दारे सरकारकडे खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत:
चंद्रपूर जिल्हा सरसकट ओला दुष्काळ त्वरित जाहीर करावा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50 हजार रुपयांची तातडीची आर्थिक मदत द्यावी. शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करून कर्ज वसुलीला स्थगिती द्यावी. शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे.
या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या वेळी काॅंग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदन देतांना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, कृउबा सभापती प्रभाकर सेलोकर, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, माजी जि.प.सदस्य डॉ राजेश कांबळे, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, प्रदेश काँग्रेस सचिव डॉ.थानेश्वर कायरकर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सोनू नाकतोडे, चिमुर विधानसभा क्षेत्रातंर्गत ब्रम्हपूरी तालुका अध्यक्ष नेताजी मेश्राम, शहर काँग्रेस कार्याध्यक्ष सुधाकर पोपटे, महीला काँग्रेस तालुकाध्यक्ष मंगलाताई लोनबले, महीला काँग्रेस शहराध्यक्ष योगिताताई आमले यांसह काॅंग्रेस तालुका,शहर काँग्रेस, युवक काँग्रेस, महीला काँग्रेस, पक्षाच्या सर्व फ्रंटल आॅर्गनाईजेशनचे व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.















