prabodhini news logo
Home ठळक बातम्या हिंदूरक्षक छत्रपती संभाजी महाराज उद्यानाच्या कुंपण भिंतीचे भूमिपूजन संपन्न

हिंदूरक्षक छत्रपती संभाजी महाराज उद्यानाच्या कुंपण भिंतीचे भूमिपूजन संपन्न

0
128

मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
प्रबोधिनी न्युज नेटवर्क

भाईंदर पूर्व : हिंदूरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रम, शौर्य आणि धर्मरक्षणाच्या कार्याला अभिवादन म्हणून उभारण्यात येणाऱ्या हिंदूरक्षक छत्रपती संभाजी महाराज उद्यानाच्या कुंपण भिंतीचे भूमिपूजन आज महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्हा पालकमंत्री मा. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

या प्रसंगी मंत्री सरनाईक म्हणाले, “मिरा-भाईंदर शहरात छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ भव्य उद्यान उभारण्याची मागणी नागरिक व हिंदू संघटनांकडून सातत्याने होत होती. आज त्या मागणीची प्रत्यक्षात पूर्तता होत आहे. हे उद्यान केवळ विरंगुळ्याचे ठिकाण नसून इतिहासाचे स्मरण करून देणारे प्रेरणादायी स्थळ ठरेल.”

हिंदुरक्षक छत्रपती संभाजी महाराज उद्यानाची वैशिष्ट्ये म्हणजे हे उद्यान १३,६३४ चौ. मी. क्षेत्रफळात असून या उद्यानाची एकूण कुंपण भिंत २१५ मीटर असणार आहे. त्याचसोबत या मैदानात हिंदुरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा आणि त्याचसमोर फाऊंटन उभारण्यात येणार आहे. सोबतच हिंदुरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे विजय पराक्रम सांगणाऱ्या वस्तू संग्रहालयाची इमारत देखील या उद्यानात पाहायला मिळणार आहे. तसेच शिवकालीन गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती, जेष्ठ नागरिकांसाठी कट्टा, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान आणि विरंगुळा कट्टा देखील या उद्यानात असणार आहे.

या उद्यानासाठी लागणारी आवश्यक जमीन जिल्हाधिकाऱ्यांकडून मिरा-भाईंदर महानगरपालिकेला हस्तांतरित करण्यासाठी मंत्री सरनाईक यांनी पुढाकार घेतला. उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी शहरातील उद्यानांच्या विकासासाठी मंजूर केलेल्या ५० कोटी रुपयांच्या निधीतून ५ कोटी रुपयांचा निधी या उद्यानासाठी खर्च करण्यात आला आहे.

मंत्री सरनाईक यांनी पुढे सांगितले की, “हिंदूरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य भावी पिढ्यांना प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या शौर्यकथा आणि धर्मरक्षणाची जाणीव नागरिकांच्या मनामनात जागृत व्हावी, यासाठी हे उद्यान साकारले जात आहे.”

या कार्यक्रमाला मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त श्री. राधबिनोद शर्मा, महानगरपालिका अधिकारी व पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here