
जळगांव जामोद (बुलढाणा) : खांडवी येथील माजी सरपंच व राष्ट्रवादीचे मागासवर्गीय सेलचे तालुका अध्यक्ष मंगल डोंगरदिवे यांनी आज दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजी नांदुरा येथे आयोजित सभेमध्ये वंचित बहुजन आघाडीत जाहीर पक्षप्रवेश केला. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराळे यांच्या नेतृत्वात तसेच पक्षाचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये त्यांनी पक्षात प्रवेश घेतला. मंगल डोंगरदिवे यांनी यापूर्वी सामाजिक व राजकीय चळवळींमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत वंचित आणि शोषित घटकांसाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाची संघटना अधिक बळकट होणार असल्याचे पक्ष पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
पक्षप्रवेश कार्यक्रमात बुलढाणा जिल्हा प्रभारी प्रदीप वानखेडे, युवा जिल्हा अध्यक्ष अनिल वाकोडे, सम्यक जिल्हा अध्यक्ष मोहित दामोदर, महिला जिल्हा अध्यक्ष विशाखा सावंग, जळगांव जामोद तालुका अध्यक्ष देवानंद दामोदर, माजी तालुका अध्यक्ष रतन नाईक, तालुका महासचिव सुनिल बोदडे यांच्यासह युवा कार्यकर्ते संतोष पवार, रोशन तायडे, भिमराव हेलोडे तसेच जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.















