
ब्रम्हपुरी – आज ब्रम्हपुरी येथे नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री योगेश मिसार आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला तसेच काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले.
ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचा लोकप्रतिनिधी म्हणून सूत्रे हाती घेताच शहराचा विकास केला. कालची ब्रम्हपुरी व आजची ब्रम्हपुरी यातील तुलनात्मक बदल आपल्याला जाणवतो आहे. या शिक्षणाच्या पंढरीला पुनश्च प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी आपण पुन्हा एकदा काँग्रेस उमेदवारांना भरभरून आशीर्वाद द्या, असे आवाहन केले.
भाजप सत्ताकाळात ब्रम्हपुरी शहराच्या विकासाला पूर्णतः खीळ बसली होती. आज दिल्ली ते गल्लीपर्यंत सत्ता आली असताना भाजपने केवळ नागरिकांना काँग्रेस काळात कार्यान्वीत केलेल्या योजना व्यतिरिक्त काहीच दिले नाही. या उलट महागाई बेरोजगारी, जीवनावश्यक वस्तूंची प्रचंड दरवाढ केली. गेल्या ६ महिन्यांपासून श्रावण बाळ, वृद्धापकाळ, निराधार योजनेचे पैसे दिले नाही. जाचक अटी लादून फसवी लाडकी बहीण योजना हे महायुती सरकार गुंडाळण्याचा तयारीत आहेत. 
आम्ही शहराच्या विकासासह येथील महिलांना रोजगार देण्यासाठी रेडिमेड गारमेंट उद्योगाच्या माध्यमातून शहरातील २ हजार महिलांना रोजगार देणार आहोत. येथील विद्यार्थी मी कार्यान्वीत केलेल्या इ- लायब्ररीतून प्रशासकीय सेवेत मोठे अधिकारी होणार आहेत. येणाऱ्या काळात शहराचा सर्वांगीण विकास करून पूर्ण चेहरामोहरा बदलविण्याचे मोठे व्हिजन हे माझ्याकडे व आमच्या काँग्रेस उमेदवारांकडे आहे.
आपण पुन्हा एकदा आम्हाला मतदार रुपी आशीर्वाद देऊन आमच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन यावेळी केले.
शिक्षणाची पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रह्मपुरी शहरातील अंतर्गत रस्ते, पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय, पथदिवे, गडार लाईनची कामे, रेल्वे लाईन वरील उड्डाण पूल, प्रशस्त शासकीय इमारती, वातानुकूलित ई – लायब्ररी, सामाजिक व सांस्कृतिक सभागृह, क्रीडा संकुल या सर्व बाबींचा शहरात कसोशीने केलेल्या विकासकामांचा आढावा प्रा. देविदास जगनाडे यांनी उपस्थितांपुढे मांडला.
या सभेस प्रा. देविदास जगनाडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप गड्डमवार, प्रसिद्ध सिनेअभिनेत्री प्रार्थना बेहेरे, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष खेमराज तिडके, शहराध्यक्ष हितेंद्र राऊत, डॉ. राजेश कांबळे, प्रमोद चिमूरकर, डॉ.थाणेश्वर कायरकर, इकबाल जेसानी, सोनू नाकतोडे, काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार योगेश मिसार व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.















