
वडसा-आरमोरी मार्गावर रुग्णवाहिकेने दुचाकीला दिली जोरात धडक; कोंढाळा गावावर शोककळा
देसाईगंज (वडसा): कष्टाच्या जोरावर बेरोजगारीवर मात करून बांधकाम व्यवसायात नाव कमावलेल्या एका तरुण जिद्दी कंत्राटदाराचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. मजुरांना त्यांची हक्काची मजुरी वाटून घराकडे परतत असताना, काळाने वाटेतच त्यांच्यावर झडप घातली. रुग्णवाहिकेने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत गंभीर जखमी झालेल्या या तरुणाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. गुरुदेव दिनाजी वसाके (३८, रा. कोंढाळा) असे मृत युवकाचे नाव आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुदेव वसाके हे कोंढाळा येथील रहिवासी असून ते बांधकाम क्षेत्रात कंत्राटदार म्हणून कार्यरत होते. सध्या त्यांचे देसाईगंज येथे बांधकामाचे काम सुरू आहे. रविवार, ३ मे रोजी मजुरांचा आठवडी पगार देण्याचा दिवस असल्याने ते देसाईगंजला गेले होते. दिवसभर मजुरीचे वाटप आणि कामाचे नियोजन आटोपून सायंकाळच्या सुमारास ते आपल्या दुचाकीने कोंढाळा गावाकडे परत येत होते.
आरमोरी मार्गे देसाईगंजकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर, कोंढाळा गावाच्या अगदी जवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका सुसाट रुग्णवाहिकेने गुरुदेव यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, त्यांची दुचाकी पूर्णपणे चक्काचूर झाली आणि गुरुदेव रक्ताच्या थारोळ्यात पडले.
वाटेतच संपली प्राणज्योत
अपघातानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी तात्काळ या घटनेची माहिती गुरुदेव यांच्या कुटुंबीयांना दिली. ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्याची धावपळ सुरू झाली. मात्र, डोक्याला गंभीर इजा आणि अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांची प्रकृती वेगाने खालावली. दुर्दैवाने, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत त्यांची प्राणज्योत मालवली.
परिवारावर कोसळले दुःखाचे डोंगर
गुरुदेव हे घरातील कर्ते आणि मुख्य व्यक्ती होते. अत्यंत कष्टाने आणि मेहनतीने त्यांनी बांधकाम व्यवसायात प्रगती केली होती. एक उमदा, होतकरू आणि सुस्वभावी तरुण अशा अपघातात गेल्यामुळे वसाके कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. या घटनेमुळे कोंढाळा गाव आणि परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच देसाईगंज पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.















